जालना : जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासोबतच विद्यार्थ्यांना आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा. पुढील दोन वर्षांत जालना जिल्ह्यातील ५०० जिल्हा परिषद शाळांचा दर्जेदार विकास करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी दिले.
मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी जिल्हा परिषद शाळांच्या विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, मनपा आयुक्त अंजली शर्मा यांच्यासह विविध अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. यापूर्वी १ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत पालकमंत्री मुंडे यांनी जिल्ह्यातील शाळांचे सर्वेक्षण करून त्यांचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आजच्या बैठकीत त्या अनुषंगाने झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.
निधीचा काटेकोर आणि परिणामकारक वापर
शाळा आणि अंगणवाड्यांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध होणारा निधी नियोजनबद्ध, काटेकोर आणि परिणामकारक पद्धतीने खर्च करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
शाळांमध्ये आवश्यक शैक्षणिक सुविधा, आकर्षक रंगरंगोटी, स्वच्छ व सुंदर परिसर, आवश्यक पायाभूत सुविधा तसेच दर्जेदार बांधकामावर भर द्यावा. प्रत्येक शाळेचा विकास करताना ‘आदर्श शाळा’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवावी, असे त्यांनी सांगितले.
‘नवीन वर्षात नवी शाळा’ अभियान
‘नवीन वर्षात नवी शाळा’ ही संकल्पना घेऊन संबंधित यंत्रणांनी अभियान स्वरूपात काम करावे. जालना जिल्ह्यात विकसित होणाऱ्या शाळा राज्यातील इतर शाळांसाठी आदर्श ठरतील, अशा गुणवत्तेची कामे झाली पाहिजेत, अशी अपेक्षा पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली. शाळांच्या विकासकामांचा पुढील आढावा घेण्यासाठी आपण स्वतः जालना येथे बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण योजनांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचाही पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. उपलब्ध निधी निर्धारित वेळेत खर्च करून मंजूर कामे कोणत्याही विलंबाशिवाय दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.