अंतरवाली सराटी ते मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा एल्गार

गणेशोत्सवात विघ्न न आणण्याचा निर्धार, पण सरकारला थेट इशारा

Jalna Nayak    11-Sep-2026
Total Views |
 
मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्यावर जरांगे यांनी जोरदार निशाणा साधला.
 
जालना -“आम्ही छत्रपती आणि हिंदूंना मानणारे लोक आहोत. त्यामुळे गणेशोत्सवात आमच्याकडून कोणतेही विघ्न येणार नाही. मात्र, छत्रपतींच्या विचारांवर चालणाऱ्यांनी गणेशोत्सवाचा मूळ इतिहास लक्षात घ्यावा. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठीच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली होती. मुंबईत येणारा आमचा प्रत्येक आंदोलक शिस्त पाळेल, पण सरकारने स्वतःच विघ्नाची भूमिका घेऊ नये,” असा सज्जड दम मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला भरला आहे.
अंतरवाली सराटी येथे गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. मात्र, सरकारकडून अद्यापही मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा संताप व्यक्त करत, त्यांनी आता थेट मुंबईच्या दिशेने कूच करण्याची तयारी दर्शवली आहे. या भूमिकेमुळे आगामी गणेशोत्सव आणि मराठा आंदोलन या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची मोठी कसोटी लागणार हे निश्चित मानले जात आहे. गोरगरीब जनतेवर अन्याय होत असताना आणि त्यांचे भवितव्य धोक्यात येत असताना न्यायव्यवस्थाच त्यांना खरा आधार देत असते, असे सांगत जरांगे यांनी न्यायालयाच्या भूमिकेचे आभार मानले. तसेच, आमचे आंदोलन पूर्णपणे लोकशाही मार्गाने आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच चालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आझाद मैदानावर आंदोलनावर ठाम
मुंबईतील आझाद मैदानावर कोणत्याही परिस्थितीत लोकशाही मार्गानेच आंदोलन पार पडेल, असा पुनरुच्चार जरांगे यांनी केला. आंदोलनासाठी सरकारने काही नियम किंवा अटी घातल्या, तरी त्यांचे तंतोतंत पालन करण्याची आमची तयारी आहे. परंतु, जर जाणीवपूर्वक आंदोलनाची परवानगीच नाकारली गेली, तर तो सरळ सरळ सर्वसामान्य नागरिकांचा लोकशाही अधिकार हिरावून घेण्याचा प्रकार ठरेल, असा इशारा त्यांनी दिला.
पोलिसांची धावपळ आणि प्रशासकीय यंत्रणा
दुसरीकडे, सोमवारपासून राज्यभरात लाडक्या बाप्पाच्या आगमनाने गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. आधीच गणेशोत्सवाच्या बंदोबस्तामुळे पोलीस यंत्रणेवर ताण असताना, त्यात जरांगे समर्थकांच्या मुंबईवारीची भर पडल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेता, शुक्रवारी जालना पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पोलीस वाहनांची मोठी जमवाजमव पाहायला मिळाली, ज्यामुळे प्रशासकीय पातळीवरील हालचालींना वेग आल्याचे स्पष्ट होते.
पोलिसांची सावध भूमिका
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला नसून सध्यातरी नियमित स्वरूपाचाच बंदोबस्त सुरू असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी स्पष्ट केले आहे. आंदोलकांना मुंबईकडे जाण्यापासून रोखण्यात येणार का, या प्रश्नावर बोलताना, “याबाबत अद्याप वरिष्ठ पातळीवरून कोणत्याही नव्या सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. जशी परिस्थिती बदलेल, तशी माहिती दिली जाईल,” अशी सावध प्रतिक्रिया साळी यांनी दिली.