तामिळनाडूतून फरार आरोपीला भोकरदन पोलिसांनी पकडले

३ किलोमीटर शेतातून पाठलाग; महिनाभरापासून होता फरार

Jalna Nayak    11-Sep-2026
Total Views |

पोलिसांनी आरोपीचा तब्बल तीन किलोमीटर शेतातून पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
 
भोकरदन- अल्पवयीन मुलीच्या संरक्षण व बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल गुन्ह्यात महिनाभरापासून फरार असलेल्या आरोपीला भोकरदन पोलिसांनी तामिळनाडू राज्यातून अटक केली. पोलिसांनी आरोपीचा तब्बल तीन किलोमीटर शेतातून पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४६०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२), ६४(२)(एम) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ मधील कलम ४, ६, ८, १२ आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मधील कलम ९, १०, ११ अन्वये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील आरोपी सोमीनाथ लक्ष्मण गायकवाड (रा. नळणी बु., ता. भोकरदन, जि. जालना) हा गुन्हा दाखल झाल्यापासून मोबाइल बंद करून महाराष्ट्राबाहेर फरार झाला होता. आरोपीचा शोध घेण्यासाठी भोकरदन पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे, पोलिस अंमलदार योगेश गवळी आणि गृहरक्षक दलाचे कर्मचारी साजिद शेख यांचे तपास पथक तयार करण्यात आले. आरोपी तामिळनाडू राज्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वरिष्ठांची लेखी परवानगी घेऊन तामिळनाडूत जाऊन शोधमोहीम सुरू केली. तपास पथकाला आरोपी तामिळनाडूतील कडायूर, ता. नांबीपूर, जि. इरोड परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिस पथक त्याचा शोध घेत असताना आरोपीने पोलिसांना पाहून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शेतातून सुमारे तीन किलोमीटरपर्यंत पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. महिनाभरापासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात भोकरदन पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजवीर सिंह संधू, अपर पोलिस अधीक्षक डॉ. विक्रम साळी, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.