अंबड : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH-753H वरील अंबड शहरातील अतिक्रमणांविरोधात प्रशासनाने धडक कारवाई केली. महामार्गाच्या हद्दीत आढळलेल्या सुमारे ३०० अतिक्रमणांपैकी २२५ अतिक्रमणे शुक्रवारी (११ सप्टेंबर) हटविण्यात आली, तर उर्वरित ७५ अतिक्रमणांवर शनिवारी कारवाई करण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत महामार्गाची हद्द अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईमुळे वाहतुकीला होणारा अडथळा दूर होऊन रस्त्याची सुरक्षितता वाढण्यास मदत होणार आहे.
महसूल, पोलीस आणि महामार्ग विभागाची संयुक्त कारवाई
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबविली.उपविभागीय अधिकारी अंबड, पोलीस उपअधीक्षक अंबड तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपअभियंत्यांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.
७५ अतिक्रमणांवर उद्या कारवाई
NH-753H च्या अंबड शहर हद्दीत एकूण ३०० अतिक्रमणे निदर्शनास आली होती. त्यापैकी २२५ अतिक्रमणे हटविण्यात आली असून, उर्वरित ७५ अतिक्रमणांवर उद्या कारवाई केली जाणार आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे महामार्गाची हद्द अतिक्रमणमुक्त होऊन वाहतूक सुरळीत, रस्ता अधिक सुरक्षित आणि नागरिकांसाठी मार्ग मोकळा होण्यास मदत होणार आहे.