19 सप्टेंबरला मनोज जरांगे मुंबईत धडकणार

अंतरवालीतून हजारो कार्यकर्त्यांना आवाहन

Jalna Nayak    12-Sep-2026
Total Views |

 बीड-पाटोदा, अहिल्यानगर-श्रीगोंदा, पुणे, खोपोली मार्गे 19 सप्टेंबर रोजी मुंबईत पोहचणार आहे.
वडीगोद्रीः मराठा आरक्षणासाठी मागील चौदा दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांनी शनिवारी सकाळी हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत मुंबई धडक नक्की झाली असून 15 सप्टेंबरला मराठा मोर्चा अंतरवालीतून निघून 19 सप्टेंबर रोजी मुंबईत धडकणार असल्याचे सांगितले. या मोर्चात राज्यातील लाखो मराठा समाजबांधव सहभागी होतील असेही जरांगे यांनी स्पष्ट करत सरकारवर जोरदार प्रकार केला. शनिवारी सकाळी अंतरवाली येथे जरांगे यांनी महत्त्वाची बैठक घेत मुंबई व्यूहरचना ठरविली. उपोषण, निवेदन देऊनही सरकार ऐकायला तयान नसल्याने मुंबई धडक देण्याची घोषणा केली. मराठा समाजाच्या पूर्ण मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नसल्याचेही जरांगे यांनी सांगून टाकले. पाच दिवसीय प्रवास शांततेत असणार असून मराठ्यांनी कोणतीही शिस्त मोडू नये, असे आवाहनही जरांगे यांनी केले. बीड-पाटोदा, अहिल्यानगर-श्रीगोंदा, पुणे, खोपोली मार्गे 19 सप्टेंबर रोजी मुंबईत पोहचणार आहे.
अंतरवालीत मोठी गर्दी
मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत हजारो मराठा पुरूष व महिलांनी अंतरवाली सराटी गाठून मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. अंतरवाली सह परिसरात सर्वच रस्ते गर्दी फुलून गेले होते. काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र होते. दरम्यान, उपस्थितांनी आम्ही जरांगे यांच्या पाठिशी पूर्ण ताकदीने उभे असल्याचे सांगून मोर्चा यशस्वी करणार असल्याचे यावेळी सांगितले. अंतरवालीतील गर्दी लक्षात घेता मोठा पोलिस बंदोबस्त तसेच रूग्णवाहिकांचीही व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली होती.