जालना: मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरणाऱ्या आणि सामाजिक शांतता धोक्यात आणणाऱ्या डी.जे. व डॉल्बी सिस्टीमवर यापुढेही सर्वधर्मीय सण, मिरवणुका आणि लग्न समारंभांमध्ये कायमस्वरूपी बंदी लागू करावी, अशी परखड भूमिका जिल्हा मराठा महासंघाने घेतली आहे. या संदर्भात महासंघाचे जिल्हा संघटक अजय कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
या शिष्टमंडळात जिल्हा मराठा महासंघ कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगेश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते शंकर माने यांचा समावेश होता. गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्हा पोलीस प्रशासनाने तीव्र आवाजाच्या डी.जे.वर कठोर निर्बंध लादून सण शांततेत पार पाडल्याबद्दल या शिष्टमंडळाने कौतुक केले. मात्र, ही बंदी केवळ एका उत्सवापुरती मर्यादित न ठेवता ती बारमाही आणि सर्वधर्मीय सण, उत्सव, राजकीय-सामाजिक मिरवणुका तसेच लग्न समारंभांमध्येही कायम ठेवावी, अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली.
डीजेच्या कानफाड्या आवाजाचे दुष्परिणाम विशद करताना म्हटले आहे की, डी.जे.च्या घातक व उच्च डेसिबलच्या आवाजामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब व पक्षाघाताने ग्रस्त रुग्णांना थेट हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. लहान मुले, वृद्ध नागरिक आणि गरोदर महिला यांच्या आरोग्याला यामुळे गंभीर धोका निर्माण होतो. आधुनिक डी.जे. संस्कृतीमुळे महाराष्ट्राची मूळ सांस्कृतिक ओळख असणारी ढोल-ताशा पथके, झांज, लेझीम आणि स्थानिक बँड-बाजा वादक बेरोजगार होत आहेत. या पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन दिल्यास संस्कृतीचे जतन होईल आणि स्थानिक कलाकारांना उदरनिर्वाहाचे साधन मिळेल.सार्वजनिक आरोग्य, सामाजिक सलोखा आणि भावी पिढीचे हित लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात डी.जे.च्या वापरावर कायमस्वरूपी बंदी घालावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मराठा महासंघाने केली आहे.
ढोल-ताशा, पारंपरिक वाद्यांना
प्रोत्साहन देऊन संस्कृती जपावी
महाराष्ट्र हा विविधतेने नटलेल्या लोकसंस्कृतीचा आणि समृद्ध लोककलांचा वारसा लाभलेला प्रदेश आहे. सण-उत्सव, लग्नसोहळे आणि मिरवणुकांमध्ये पूर्वापार वाजवली जाणारी ढोल-ताशा, संबळ, हलगी, लेझीम आणि बँड-बाजा यांसारखी वाद्ये केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती आपल्या ऐतिहासिक शौर्याची, धार्मिक भावनेची आणि सामाजिक एकात्मतेची प्रतीके आहेत. अलीकडच्या काळात डी.जे. आणि डॉल्बी सिस्टीमच्या अनिर्बंध वापरामुळे या मूळ संस्कृतीवर घाला येत असून, पारंपरिक वाद्यांचे पुनरुज्जीवन करणे काळाची गरज बनले आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.