जालना : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक परिसरात मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्ती तसेच गणेशोत्सवाशी संबंधित साहित्य विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. मात्र, या दुकानांमुळे थेट स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याभोवतीचा परिसर झाकला गेल्याचा प्रकार समोर आल्यानंतर जालना शहरातील ब्राह्मण समाज तसेच विविध हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या.यावेळी नगरसेवक सिद्धिविनायक मुळे, रवींद्र देशपांडे, महेश भालेराव, जगदीश गौड यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
गणेशोत्सवासाठी शहरात विविध ठिकाणी गणेशमूर्ती व सजावटीच्या साहित्याची दुकाने लावण्यात आली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सावरकर स्मारक परिसरातही विक्रेत्यांनी दुकाने उभारली. मात्र, काही दुकानांचे साहित्य आणि तात्पुरत्या स्वरूपातील रचना थेट सावरकरांच्या पुतळ्यासमोर उभारण्यात आल्याने पुतळा झाकला गेला. त्यामुळे स्मारकाच्या पावित्र्याचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीचा अवमान होत असल्याची भावना समाजबांधवांकडून व्यक्त करण्यात आली.
या प्रकाराची माहिती मिळताच जालना शहरातील ब्राह्मण समाजातील नागरिक, कार्यकर्ते तसेच हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी स्मारक परिसरात दाखल झाले. त्यांनी महापालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. स्मारक परिसर तात्काळ अतिक्रमणमुक्त करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, संबंधितांनी महापालिका प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचा इशारा देत, स्मारक मोकळे न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. त्यामुळे काही काळ स्मारक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेतली. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून विक्रेत्यांना स्मारक परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. महापालिकेने तातडीने कारवाई करत सावरकर स्मारक परिसर मोकळा करण्यास सुरुवात केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. स्मारक परिसरात गणेशमूर्ती विक्रीसाठी दुकाने लावताना स्मारक, पुतळा आणि परिसराच्या मर्यादेचे भान ठेवणे आवश्यक असल्याची मागणीही यावेळी करण्यात आली. उत्सवाच्या काळात विक्रेत्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देतानाच ऐतिहासिक व महत्त्वाच्या स्मारकांवर अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता महापालिकेने घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
कारवाईमुळे वादाला तात्पुरता विराम
महापालिकेने तातडीने अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केल्याने निर्माण झालेला वाद काही प्रमाणात शांत झाला. मात्र, भविष्यात अशा प्रकारे सावरकर स्मारक परिसरात अतिक्रमण होऊ नये आणि स्मारकाची प्रतिष्ठा कायम राखली जावी, यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर तात्पुरती दुकाने उभारली जात असल्याने महापालिका प्रशासनासमोर अतिक्रमण नियंत्रणाचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे उत्सव सुरू होण्यापूर्वीच विक्रेत्यांना निश्चित जागा देऊन स्मारक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे अतिक्रमणमुक्त ठेवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.