वालसावंगीच्या मिरची उत्पादकांवर दुहेरी मार; हिरव्याने रडवले, लालने वाळवले!

​विकतचे पाणी पाजून, रोगराईशी लढा देऊनही पदरी निराशा; पावसाळी ढगांमुळे लाल मिरचीही सडण्याच्या मार्गावर; शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी.

Jalna Nayak    13-Sep-2026
Total Views |

शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर मिरचीची पिके सुकू लागली.
 
 
विशाल अस्वार
वालसावंगी: वालसावंगी व परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या अपेक्षेने व अपार कष्टाने मिरचीची लागवड केली. हिरव्या मिरचीला सोन्याचा भाव मिळेल, या स्वप्नात शेतकरी बुडालेले होते. मात्र, हिरव्या मिरचीला सुरुवातीपासूनच कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली. यातच, पावसाने दगा दिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर मिरचीची पिके सुकू लागली. हताश झालेल्या शेतकऱ्यांनी आपली हिरवी मिरची वाचवण्यासाठी अखेरचा उपाय म्हणून विकतचे पाणी टँकरद्वारे विहिरीत आणून पिकांना दिले.
​खर्च, कष्ट आणि रोगराईशी झुंजून शेतकरी यातून कसेबसे बाहेर पडले, पण त्यांचे नशीब इथेच थांबले नाही. शेवटी लाल मिरचीवर आशा ठेवून शेतकऱ्यांनी हिरवी मिरची तोडणी थांबवली आणि लाल मिरची तोडली. आता ही लाल मिरची वाळवून विकण्याची वेळ आली असतानाच, वालसावंगीच्या आकाशाला ढगांनी वेढा घातला आहे. अधूनमधून पडणारा रिमझिम पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे मिरची पूर्णपणे वाळवणे अशक्य झाले आहे. यामुळे मिरचीचा दर्जा बिघडत चालला असून, बुरशी आणि सड लागल्याने ती आता बाजारात विकण्याच्या योग्यतेची राहिली नाही.
​बाजारात विक्रीसाठी नेली असता, व्यापारी हिरव्या मिरचीप्रमाणेच लाल मिरचीलाही मातीमोल भाव देत आहेत. लागलेला लाखो रुपयांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. यामुळे वालसावंगीच्या मिरची उत्पादक शेतकऱ्यावर अक्षरशः दुहेरी संकट ओढवले आहे. हिरव्या मिरचीने सुरुवातीला डोळ्यात पाणी आणले होते, तर आता लाल मिरचीही ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांना रडवू लागली आहे. आता सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची तातडीने पाहणी करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.