जालना - वृद्धाचा चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न; संतप्त नागरिकांनी आरोपीचे घर पाडले

माजी आ.कैलास गोरंट्याल यांनी आक्रमक भूमिका घेत थेट सदर बाजार ठाणे गाठून समर्थकांसह ठिय्या आंदोलन

Jalna Nayak    13-Sep-2026
Total Views |
 
नागरिकांनी थेट संशयिताच्या घरावर धडक देत तोडफोड
 
जालना - अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आल्यामुळे जालना शहरात रविवारी संतापाचा उद्रेक झाला. रामनगर परिसरातील दिनकर कॉलनी येथे घडलेल्या या कथित प्रकाराची माहिती मिळताच संतप्त नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. नागरिकांनी थेट संशयिताच्या घरावर धडक देत तोडफोड केली. घराचे पत्रे व इतर साहित्य काढून टाकत घराचा काही भाग जमीनदोस्त करण्यात आला.दरम्यान, आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या घटनेमुळे दिनकर कॉलनी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चिमुकलीसोबत कथित गैरप्रकार करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी संतप्त भूमिका नागरिकांनी घेतली. मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाल्याने पोलिसांनाही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला.
पोलिसांकडून संशयित ताब्यात
दरम्यान, घटनेची गंभीर दखल घेत सदर बाजार पोलिसांनी संशयित ६० वर्षीय दिनेश काशिनाथ सुवर्णकार याला ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सदर बाजार पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाली. त्यानुसार गुन्हा दाखल करून संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, त्याला न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
 पालकांमध्येही चिंतेचे वातावरण
अल्पवयीन मुलीला लक्ष्य केल्याच्या आरोपामुळे परिसरातील पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. लहान मुलांना विविध आमिषे दाखवून त्यांच्याशी गैरप्रकार करण्याच्या घटना रोखण्यासाठी अधिक प्रभावी जनजागृती आणि सुरक्षाव्यवस्था आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
 
 
माजी आ.कैलास गोरंट्याल यांनी आक्रमक भूमिका
माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा आक्रमक पावित्रा
चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच माजी आ.कैलास गोरंट्याल यांनी आक्रमक भूमिका घेत थेट सदर बाजार ठाणे गाठून समर्थकांसह ठिय्या आंदोलन केले. आरोपीला तात्काळ अटक करून कडक शिक्षा देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. यासोबतच गोरंट्याल यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी गोरंट्याल यांनी केली.