पोलीस अधीक्षक आणि महानगरपालिका आयुक्तांनी संयुक्त समिती स्थापन करावी - अँड. महेश धन्नावत

जालना शहरातील डॉ. राजेंद्र प्रसाद रोडवरील वाहतूक कोंडी आणि स्वच्छतेसाठी

Jalna Nayak    13-Sep-2026
Total Views |

मागणी श्री गणेश महासंघाचे कार्याध्यक्ष अँड. महेश धन्नावत यांनी केली
 
जालना - जालना शहरातील अत्यंत वर्दळीचा डॉ. राजेंद्र प्रसाद रोड हा गणेशोत्सव काळात पूर्णपणे जाम होतो, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जालना महानगरपालिका आयुक्त यांनी एकत्र येऊन एक संयुक्त समिती स्थापन करावी, जेणेकरून वाहतूक आणि स्वच्छता दोन्ही व्यवस्थित राखली जाईल आणि पुढील वर्षाच्या व्यवस्थापनासाठी एक केस स्टडी तयार होईल, अशी मागणी श्री गणेश महासंघाचे कार्याध्यक्ष अँड. महेश धन्नावत यांनी केली आहे.
अँड. धन्नावत म्हणाले की, पोलिसांनी आजपासूनच या रोडवरील १०० पेक्षा अधिक गणेश मंडळांशी समन्वय साधावा. प्रत्येक मंडळाने एक स्वयंसेवक द्यावा आणि त्याच्या जोडीला एक पोलीस कर्मचारी द्यावा, म्हणजे प्रत्येक मंडपाच्या ठिकाणी वाहतूक अडणार नाही. रस्ता मोकळा राहिल्यास महिला आणि लहान मुलांना या रस्त्यावरून सुरक्षितपणे ये-जा करता येईल आणि रुग्णवाहिकेलाही अडथळा येणार नाही.
तसेच पर्यावरण मंत्री मा. पंकजाताई मुंडे यांच्या विभागाच्या दृष्टीनेही हे महत्वाचे आहे, कारण वाहतूक कोंडीत गाड्या तासन्तास उभ्या राहिल्याने मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते. वाहतूक सुरळीत राहिल्यास प्रदूषण कमी होईल. यासाठी पोलिसांनी हा रस्ता वन-वे घोषित करून सर्व गणेश मूर्तींच्या आगमनाची वेळ एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत समन्वय साधून ठरवावी.
सर्वात महत्वाचे म्हणजे हैदराबादच्या धर्तीवर जालन्यातही गणेश मूर्तीच्या उंचीवर निर्बंध आणावे. हैदराबादमध्ये इलेक्ट्रिक वायरची उंची २२ फूट आणि वाहनाची उंची ४ फूट विचारात घेऊन गणेश मूर्तीची उंची १५ फूटापर्यंत मर्यादित ठेवली आहे. त्याच धर्तीवर जालन्यातही मूर्तीची उंची निश्चित करावी, जेणेकरून वाहतुकीला आणि विजेच्या तारांना कोणताही धोका निर्माण होणार नाही. याची संयुक्त समितीने नोंद घेऊन पुढील वर्षासाठी एक आदर्श व्यवस्थापनाचा केस स्टडी तयार करावा, असेही अँड. धन्नावत यांनी म्हटले आहे.