गणेशोत्सव : परंपरेपासून अंतर्मुख भक्तीपर्यंत

गणेशपर्व-२०२६- जीवनमूल्यांची आठवण करून देणारा उत्सव

Jalna Nayak    14-Sep-2026
Total Views |
 
गणपती हा भारतीय मनातील अत्यंत लोकप्रिय देव
 
 
-सुहास अंजनकर
आज भाद्रपदातील चतुर्थी.यावर्षी वरुणराजाने मोठी हुलकावणी दिल्याने वातावरणात म्हणावा तसा उबदारपणा आणि प्रसन्नता नसल्याने, एकूणच बाजारपेठेत आणि भक्तांमध्ये त्याचे सावट आहे. तरी गणपती बाप्पांच्या प्रेमासाठी, त्याच्या भक्तीसाठी घराघरांत लगबग सुरू झाली आहे. सजावट, फुलांचा सुगंध, आरतीचे स्वर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, यामुळे वातावरण भक्तिमय होणारच आहे. कारण गणेशोत्सव हा केवळ उत्सव, सजावट आणि आनंदाचा सोहळा नाही; तो आपल्या संस्कृतीने दिलेल्या अनेक जीवनमूल्यांची आठवण करून देणारा उत्सव आहे.
गणपती हा भारतीय मनातील अत्यंत लोकप्रिय देव. त्यालाच फक्त बाप्पा या नावाने आपण प्रेमाने हाक मारतो. कोणत्याही मंगलकार्याच्या प्रारंभी गणेशपूजन करण्याची परंपरा आहे. कारण गणेश म्हणजे बुद्धी, विवेक, प्रज्ञा आणि शुभारंभाचे प्रतीक. त्यांच्या नावापुढे ‘विघ्नहर्ता’ हे विशेषण जोडले जाते. परंतु जीवनातील विघ्ने दूर करण्याचा अर्थ केवळ संकटे नाहीशी होणे असा नसून, संकटांना सामोरे जाण्याची बुद्धी आणि सामर्थ्य मिळणे असाहीत्याचा अर्थ आहे.
गणपतीचे स्वरूप स्वतःमध्ये एक सुंदर जीवनदर्शन सामावून घेते. हत्तीचे विशाल मस्तक व्यापक विचाराचे प्रतीक, मोठे कान म्हणजे प्रत्येकाचे शांतपणे ऐकण्याची शिकवण, तर लहान डोळे एकाग्रतेचा संदेश देतात. मोठे पोट जीवनातील सुख-दुःख पचवण्याची क्षमता दर्शवते. सोंडेची लवचिकता परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याचे शहाणपण शिकवते. गणपतीचे वाहन असलेला उंदीर चंचल मन आणि अमर्याद इच्छा यांचे प्रतीक मानला जातो. त्या उंदरावर आरूढ झालेला गणपती म्हणजे विवेकाने इच्छांवर आणि मनाच्या चंचलतेवर मिळवलेले नियंत्रण.लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप दिले. धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणणे, लोकांमध्ये ऐक्य आणि राष्ट्रीय भावना जागृत करणे, हा त्यामागील महत्त्वाचा हेतू होता. त्यामुळे गणेशोत्सवाने धार्मिक चौकटीपलीकडे जाऊन सामाजिक परिवर्तनाचेही कार्य केले.
आजच्या काळात गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत आहे. उत्साहाबरोबरच पर्यावरणाची जाणीव असणेही आवश्यक आहे. शाडू मातीच्या मूर्ती, नैसर्गिक सजावट, निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन आणि जलप्रदूषण टाळण्याचे प्रयत्न अनेक संस्थांकडून होत आहे. कारण निसर्गाचे रक्षण आता ऐरणीवरचा विषय झाला आहे. खरी गणेशभक्ती आरतीच्या स्वरांमध्ये जितकी आहे, तितकीच ती आपल्या आचरणातही असायला हवी. विवेकाने विचार करणे, संयमाने वागणे, इतरांचे ऐकून घेणे, अहंकार दूर ठेवणे आणि अडचणींवर धैर्याने मात करणे—हीच गणपतीबाप्पाची शिकवण आहे.