जालना : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जालना शहरात धडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील दोन मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी करून मोठ्या प्रमाणात मिठाईचा साठा जप्त करण्यात आला.
आर. पी. रोड, जालना येथील मे. आकाश नंदकिशोर अग्रवाल या मिठाई विक्री आस्थापनावर तपासणी करण्यात आली. यावेळी मैसूर पाक, हलवा आणि शेव या अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले. आस्थापनामध्ये अस्वच्छ पद्धतीने साठवणूक केल्याचे तसेच विना परवाना व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले.
व्यापक जनहित लक्षात घेऊन या आस्थापनातील तब्बल ७९७ किलो अन्नपदार्थांचा साठा, अंदाजे १ लाख ८ हजार ६९० रुपये किमतीचा, जप्त करण्यात आला. तसेच पुढील आदेशापर्यंत सदर आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, मे. लक्ष्मी स्वीट्स, मस्तगड, जालना या आस्थापनाचीही तपासणी करण्यात आली. येथे ‘स्वीट मावा’ या खाद्यपदार्थाचा नमुना घेण्यात आला. उर्वरित ५८ किलो साठा, अंदाजे १७ हजार ४०० रुपये किमतीचा, लेबलवरील दोष आणि अस्वच्छ साठवणुकीमुळे जप्त करण्यात आला. हा साठा नंतर नष्ट करण्यात आला.
या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ८५५ किलो अन्नपदार्थांचा साठा कारवाईच्या कक्षेत आला असून, त्याची एकूण किंमत १ लाख २६ हजार ९० रुपये आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी तांबे मुळे, विनोद ओसावार आणि योगेश चिभडे यांनी केली. सदर कारवाई श्री. निखिल कुलकर्णी, सहायक आयुक्त (अन्न), जालना तसेच श्री. श्रीकांत करकाळे, सह आयुक्त (अन्न), छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.