मनोज जरांगेंनी समाजमन ढवळून टाकले

दौऱ्याच्या सभेला लाखोंची उपस्थिती

Jalna Nayak    16-Sep-2026
Total Views |

मनोज जरांगे यांनी खरोखर समाजमन ढवळून टाकले
 
वडीगोद्रीः मराठा समाजासाठी आरक्षण तसेच इतर मागण्यांसाठी सातत्याने मागील काही वर्षांपासून लढा देणारे मनोज जरांगे यांनी खरोखर समाजमन ढवळून टाकले असून त्यांनी सोबत येऊ नका असे म्हणल्यावरही त्यांच्या दौऱ्याच्या मार्गावर हजारो नव्हे लाखोंनी समाजबांधव उपस्थित रहात आहेत. जरांगे हे मंगळवारी अंतरवालीहून मुंबईकडे निघाले आहेत. या मार्गावर लाखो मराठा बांधवांनी जरांगे पाटलांना समर्थनच नव्हे तर आम्ही तुमच्यासोबत आहोत हे संख्येवरून दाखवून दिले. गेल्या काही दशकात इतके समर्थन मिळविणारे नेते म्हणून मनोज जरांगें यांचा उदय झाला असेही म्हणल्यास वावगे ठरू नये.
बीड असो पाटोदा असो सर्वच ठिकाणी झालेली गर्दी आणि मिळणारा प्रतिसाद खुप काही सांगून जातो. विशेष म्हणजे बोलण्या इतकाही त्राण जरांगे यांच्यामध्ये नाही मात्र घेतलेला वसा सोडायचा नाही याप्रमाणे हालअपेष्टा सोसत ते मार्ग काढत आहेत मनोज जरांगे यांच्या दौऱ्यामुळे प्रशासनाचीही कोंडी झाली असून ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था तसेच इतर बाबी पाहून मोठा ताण आला असल्याचे चित्र आहे.
मुंबईत पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मोठा पेच निर्माण झाला असून जरांगेंना मुंबईच्या वेशीवर रोखले जाते की सरकार शिष्टमंडळ पाठवून पुन्हा काही चर्चा करेल अशाही चर्चा सुरू आहेत. दरम्यान, प्रकृतीमुळे जरांगे दौरा थांबणारा का असाही प्रश्न उपस्थित होते आहे. पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती पूर्णपणे ढासळली आहे.