जालनाः महापालिकेत वादाची शृंखला थांबण्यास तयार नसून काही महिन्यांपूर्वी दोन वरिष्ठ नगरसेवकांमधील झालेला वाद शमत असतानाच 16 सप्टेंबर रोजी चार वाजेनंतर महापौर दालनात महापौरांचे चिरंजीव रणजित मगरे व सभापती कपिल भुरेवाल यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाद झाल्याचे कळताच माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी तात्काळ महापालिकेत धाव घेत दोन्ही गटांची समजूत काढून वाद निवळण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे महापौरांसमोर हा वाद झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार निविदा प्रक्रियेवरून हा वाद झाल्याचा सांगण्यात आले. दोघांमध्ये शाब्दीक सोबतच मारहाण झाल्याचीही माहिती प्रत्यक्षदर्शी सूत्रांनी दिली. महापालिकेत सूसुत्रता आणण्यासाठी मोठा प्रयत्न होत असले तरी त्याला यश येत नसल्याचे चिन्हे आहेत. वादाची माहिती मिळताच नगरसेवक अक्षय गोरंट्याल, महावीर ढक्का, रमेश गौरक्षक, संतोष माधोले, शशिकांत घुगे, माऊली पवार यांच्यासह इतर अनेक नगरसेवक पालिकेत दाखल झाले होते. कदिम जालना पोलिस तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकणी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी पालिकेत उपस्थित होते. दरम्यान, महापौरांचे चिरंजीव रणजित मगरे यांनी कोणताही वाद झाला नसून अफवा पसरू नये अशी प्रतिक्रिया दिली आहे.