सोमवारपासून जालन्यात सिटी बसचा ‘श्रीगणेशा’!

अर्जुन खोतकर यांच्या पाठपुराव्याला यश, एसटी महामंडळासोबतच्या बैठकीत निर्णय

Jalna Nayak    17-Sep-2026
Total Views |

सिटी बस सेवा येत्या सोमवारपासून सुरू होणार असल्याची माहिती शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना दिली.
 
जालना- अखेर जालना शहरातील सिटी बस सेवेचा प्रश्न मार्गी लागला आहे! शहरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेली सिटी बस सेवा येत्या सोमवारपासून सुरू होणार असल्याची माहिती शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना दिली.
सिटी बस सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने गुरुवारी (१७ सप्टेंबर) आमदार अर्जुनराव खोतकर आणि एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक सपकाळ मॅडम यांच्यात सुमारे तासभर बैठक झाली. या बैठकीत सोमवारपासून शहरात सिटी बस सेवा सुरू करण्याबाबत निर्णय झाल्याचे आमदार खोतकर यांनी सांगितले. जालना शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न गेल्या काही काळापासून चर्चेत होता. शहरातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार तसेच दररोज विविध कामांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना खासगी वाहनांवर किंवा उपलब्ध मर्यादित वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागत होते. ही गैरसोय लक्षात घेऊन आमदार अर्जुनराव खोतकर यांनी सिटी बस सेवा सुरू करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून पाठपुरावा केला. या पाठपुराव्यानंतर एसटी महामंडळासोबत झालेल्या बैठकीत सिटी बस सुरू करण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार सिटी बस सेवा शहरातील महत्त्वाच्या भागांना जोडणार आहे.
बस स्थानक → सुभाष चौक → मुथा बिल्डिंग → मस्तगड → गांधी चमन → रेल्वे स्थानक → नूतन वसाहत → अंबड चौफुली → इंदेवाडी या मार्गावर सिटी बस धावणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सिटी बस सुरू झाल्याने शहरातील दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गासाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. जालना शहराचा विस्तार वाढत असताना शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची गरज सातत्याने व्यक्त केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर सिटी बस सेवा सुरू होणे हा नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या सिटी बस सेवेला अखेर हिरवा कंदील मिळाला असून, सोमवारपासून प्रत्यक्ष बस रस्त्यावर धावणार असल्याने जालनाकरांचे लक्ष आता बस सेवेकडे लागले आहे.