गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीबालविश्व समजून घ्यावे - डॉ श्रुती पानसे

मन- मेंदू आणि मस्तक घडविण्यासाठी कृतीशीलता असावी..

Jalna Nayak    17-Sep-2026
Total Views |

शिक्षणतज्ज्ञ डॉ श्रुती पानसे
 
जालना - शिक्षकांनी वर्गातील मुलांना प्रथम समजून घेतले पाहिजे. सुरवातीला मुलांच्या मेंदुला शिकण्यासाठी तयार केले पाहिजे. विद्यार्थ्यांचे अवधान, त्यांचे मन स्थिर होऊन तो जागृत झाला की विद्यार्थ्यांचे अध्ययन सुरू होते. विद्यार्थ्यांना केवळ वर्गात बसून ठेवू नये कारण बसल्याने हळूहळू मेंदूतील प्राणवायू कमी व्हायला लागतो म्हणून पंधरा वीस मिनिटांनी विद्यार्थ्यांना उभा करून काही खेळ, कृती, गट कार्य असे काही केले पाहिजे असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ डॉ श्रुती पानसे यांनी ऑनलाइन कार्यक्रमात बोलताना केले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना, शिक्षण विभाग जिल्हा परिषद जालना व शिक्षण विभाग महानगर पालिका जालना यांच्या वतीने ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. पुढे बोलताना डॉ श्रुती पानसे म्हणाल्या, की लहान वयात विद्यार्थ्यांचा मेंदू हा गतीने शिकण्यासाठी तयार असतो. डावा मेंदू हा भाषा, गणित, विश्लेषण अशा क्रिया मेंदू करतो तर उजवा मेंदू हा भावनात्मक कार्य करतो. शिक्षकांनी डाव्या मेंदूसोबत उजव्या मेंदूला ही कामाला लावायला हवा. केवळ शिक्षकच बोलत असेल तर केवळ डावा मेंदू काम करेल पण कृती युक्त अध्यापन असेल तर डावा व उजवा मेंदू कार्यरत राहील व मुलांचे अध्ययन पक्के होईल. दीर्घ काळ स्मरणात राहील. न्युराॅन्सची जोडणी सतत करत राहणे म्हणजे अध्ययन होय. शिकण्यासाठी सराव फार महत्त्वाचा असतो. शारीरिक किंवा मानसिक शिक्षा ही अध्ययनात अडथळा निर्माण करीत असतात. पालक किंवा शिक्षक जेव्हा रागावतात तेव्हा मेंदू न्युराॅन्सची जोडणी बिघडते. मुलांना न येणं ही समस्या नाही तर ते अध्ययन कसे येईल याचा विचार शिक्षकांनी करणे गरजेचे आहे.मुलांना जेवढे अनुभव देवू तेवढे विद्यार्थी शिकायला लागतात. विद्यार्थ्यांना मैदानावर खेळायला आवडते, उत्सव,सण साजरे करायला आवडतात कारण त्यात भावना असतात. घरातील भांडणे, घरातील समस्या, सततच्या किरकिरी, झोप पूर्ण न होणे, व्यवस्थित जेवण न करणे यामुळे मेंदूची न्युराॅन्सची जोडणी व्यवस्थीत होत नाही. दर अर्ध्या तासाने मुलांना पाणी प्यायला सांगितले पाहिजे कारण पाण्याने न्युराॅन्सची जोडणी चांगली होते, फास्ट फूड व पॅकेज फूड टाळायला हवे कारण याचा परिणाम अध्ययनावर, मुलांच्या वाढ व विकासावर होत असतो असे त्या म्हणाल्या.
या व्याख्यानासाठी प्राचार्य श्रीमती सान्वी देशमुख, शिक्षणाधिकारी संगीता भागवत, शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, मनपा
शिक्षणाधिकारी डॉ प्रकाश मांटे, उपक्रम प्रमुख आयडॉल शिक्षक पेंटू मैसनवाड, विशाल सिरसाठ, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, विषय साधन व्यक्ती, मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ प्रमोद कुमावत यांनी केले. व्याख्यात्यांचा परिचय पेंटू मैसनवाड यांनी करून दिला..दर महिन्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात येणार असल्याचे संयोजन समितीने कळविले आहे.