जालना : जालना महानगरपालिकेतील कारभारावरून काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याणराव काळे यांनी महापालिकेवर जोरदार निशाणा साधला आहे. नगरसेवकांमध्ये सातत्याने वाद-विवाद आणि भांडणे सुरू असून, त्याचा परिणाम शहराच्या विकासकामांवर होत असल्याचा आरोप त्यांनी केला. “जालना महानगरपालिका बरखास्त करावी,” अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे डॉ. काळे यांनी गुरुवारी (दि. १७) स्पष्ट केले.
जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मामा चौक, जुना जालना येथील स्वास्तिक भोजनालयात नवनियुक्त शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. काळे बोलत होते. डॉ. काळे म्हणाले की, महानगरपालिका ही शहराच्या विकासाची महत्त्वाची यंत्रणा आहे. नागरिकांना चांगले रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेतील अंतर्गत वाद-विवादांमुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला. महापालिकेतील कारभारामुळे शहराच्या विकासावर परिणाम होत असेल तर त्याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे, असेही डॉ. काळे यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर महापालिका बरखास्त करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कल्याणराव दळे, राजेंद्र राख, बदर चाऊस, माजी आमदार राजेश राठोड, राजाभाऊ देशमुख, संजय मुथा, सुनील चौधरी, राजेंद्र गोरे, अशोक उबाळे, ज्ञानेश्वर भादरंगे, चैतन्य जायभाये, नंदा मित्तल यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहर काँग्रेसची नव्याने बांधणी करणार
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे यांनी जालना शहर काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा निर्धार व्यक्त केला. शहरातील प्रत्येक प्रभागात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविण्यासोबतच सामान्य नागरिकांशी थेट संपर्क साधून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात येईल, असे डॉ. धानुरे यांनी सांगितले. युवक, महिला, विद्यार्थी, कामगार तसेच विविध समाजघटकांपर्यंत पक्षाचा जनसंपर्क वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. “पदाधिकारी केवळ पदावर राहण्यासाठी नसून जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून काम करणारे असावेत,” असे डॉ. धानुरे म्हणाले.