जालना: गणेशोत्सव हा अत्यंत पवित्र, मांगल्याचा आणि आनंदाचा सण आहे. परंतु, या उत्सवाच्या नावाखाली जर कोणी बेकायदेशीर गणेश मंडप घालत असेल, अनधिकृतपणे विजेची चोरी करत असेल किंवा मंडप परिसरात कोणतेही गुन्हेगारी कृत्य करत असेल, तर ते थेट भगवान श्री गणेशाचा अवमान करण्यासारखेच आहे, असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध विधीतज्ज्ञ अॅड. अश्विनी महेश धन्नावात यांनी आपल्या निवेदनात केले आहे. अॅड. धन्नावात यांनी पुढे बोलताना सांगितले की, भगवान श्री गणेश हे स्वतः नियम, कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षक व पालनकर्ते आहेत. बाप्पा नेहमी सर्वांना सन्मार्गाने आणि कायद्याच्या चौकटीत राहून चालण्याची सद्बुद्धी देतात. असे असताना, त्यांच्याच उत्सवात कायद्याचे उल्लंघन करणे आणि बेकायदेशीर कृत्ये करणे अत्यंत चुकीचे असून, यामुळे सणाच्या मूळ हेतूलाच काळिमा फासली जातो.
याप्रसंगी बोलताना अॅड. अश्विनी महेश धन्नावात यांनी जालन्यातील सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, जालनेकर नागरिक आज खरोखरच अत्यंत भाग्यवान आहेत; कारण जिल्ह्याला अत्यंत सक्षम, खंबीर आणि कर्तव्यदक्ष अधिकार्यांचे नेतृत्व लाभले आहे. जालना जिल्हाधिकारी अश्मिता मित्तल यांच्या दूरदर्शी आणि लोकभिमुख कार्यपद्धतीमुळे जिल्हा प्रगतीपथावर आहे. तसेच शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी जालना महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा अतिशय कौतुकास्पद आणि गतिमान काम करत आहेत. दुसरीकडे, संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू यांचे कडक व तत्पर प्रशासन कार्यरत आहे. अशा सक्षम त्रिकुटाच्या हाती जालन्याची धुरा असल्याने नागरिकांमध्ये सुरक्षिततेचे आणि समाधानाचे वातावरण आहे. या अधिकार्यांच्या शिस्तीला आणि प्रयत्नांना दाद देत सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सध्या सर्वत्र गणेश मंडळांकडून बाप्पाच्या स्वागतासाठी आणि मंडप उभारणीसाठी लगबग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अॅड. धन्नावात यांनी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. मंडप उभारताना आणि एकूणच उत्सवाच्या काळात सर्वसामान्य नागरिक, रुग्ण, वृद्ध आणि महिलांना कोणताही त्रास होणार नाही याची प्राथमिक काळजी सर्वच मंडळांनी घेतली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत त्यांनी आवाहन केले की, सर्व गणेश मंडळांनी आपल्या संघटनांमध्ये आणि व्यवस्थापनात महिलांना मोठ्या प्रमाणावर सामील करून घेतले पाहिजे. तसेच, उत्सवाच्या काळात देखावे आणि बाप्पाच्या दर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या महिला पूर्णपणे सुरक्षित राहतील आणि त्यांना सन्मानाची वागणूक मिळेल, याची चोख व्यवस्था मंडळांनी करावी. सर्व गणेश मंडळांनी महिलांशी संबंधित सामाजिक विषयांना आणि त्यांच्या समस्यांना आपल्या देखाव्यांच्या माध्यमातून हायलाइट (प्रसिद्धी) करावी, जेणेकरून समाजात सकारात्मक संदेश जाईल.
अॅड. अश्विनी महेश धन्नावात यांनी पुढे एक अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा मांडला. त्यांनी स्पष्ट केले की, जर कोणत्याही महिला कर्मचाऱ्याचा किंवा महिला कार्यकर्त्याचा कुठेही छळ अथवा छेडछाड झाली, तर त्यांनी अजिबात न घाबरता जिल्हाधिकारी कार्यालयातील 'स्थानिक तक्रार समिती'कडे थेट तक्रार नोंदवावी. या समितीच्या माध्यमातून पीडित महिलांना तात्काळ आणि योग्य न्याय दिला जाईल.
उत्सवाचा आनंद प्रत्येकाला घेता यावा यासाठी अॅड. धन्नावात यांनी मंडळांना वाहतूक नियंत्रण आणि स्वच्छतेचे काटेकोर पालन करण्याचे सुचवले आहे. उत्सवाच्या काळात शहरात मोठी गर्दी होते. त्यामुळे कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये आणि रस्ते मोकळे राहावेत, यासाठी प्रत्येक मंडळाने आपल्या स्तरावर विशेष स्वयंसेवकांची नियुक्ती करावी. हे स्वयंसेवक वाहतूक पोलिसांना मदत करतील. तसेच मंडप आणि देखाव्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा किंवा प्लास्टिक जमा होणार नाही, याची काळजी स्वयंसेवकांनी घ्यावी. बाप्पाच्या दरबारात स्वच्छता राखणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. धार्मिक उत्सवाच्या आडून होणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांमुळे सणाचे पावित्र्य धोक्यात येते. त्यामुळे प्रशासनाचे सर्व नियम पाळून, अधिकृत परवानग्या घेऊन आणि विजेची रीतसर कायदेशीर जोडणी घेऊनच उत्सव साजरा करावा. जेव्हा सर्व मंडळे कायदा पाळतील, स्वच्छता राखतील, महिलांचा सन्मान व सुरक्षा करतील आणि नागरिकांची सोय बघतील, तेव्हाच हा उत्सव खऱ्या अर्थाने पूर्ण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करता येईल, असेही अॅड. अश्विनी महेश धन्नावात यांनी आपल्या निवेदनात शेवटी नमूद केले.