जाफ्राबाद : चंद्रकांत पंडित
खेळताना लहान मुलांच्या हातून तोंडात गेलेली एखादी छोटी वस्तू किती धोकादायक ठरू शकते, याची प्रचिती जालना येथे आली. एका बालकाच्या अन्ननलिकेत चक्क पाच रुपयांचे नाणे अडकले. नाणे अडकल्यानंतर बालकाला त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तातडीने त्याला जालना येथील अमृत बालरुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर नाणे अन्ननलिकेत अडकल्याचे स्पष्ट झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी वेळ न दवडता नाणे बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.
दुर्बिणीतून नाणे बाहेर
डॉ. संदीप सोनसळे, डॉ. अमोल दह्याळकर, डॉ. पडळू आणि डॉ. नरेंद्र नांगरे यांच्या वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार सुरू केले. अत्याधुनिक दुर्बिणीच्या मदतीने अन्ननलिकेत अडकलेले पाच रुपयांचे नाणे यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले. नाणे बाहेर काढल्यानंतर बालकाला मोठा दिलासा मिळाला. वेळेत उपचार मिळाल्याने संभाव्य गंभीर परिस्थिती टळली. उपचारानंतर बालकाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने कुटुंबीयांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.
डॉक्टरांच्या तत्परतेमुळे कुटुंबीयांना दिलासा
अन्ननलिकेत एखादी वस्तू अडकली असताना विलंब झाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे बालकाला त्रास जाणवताच कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून योग्य उपचार केल्याने नाणे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या यशस्वी उपचारानंतर बालकाच्या कुटुंबीयांनी डॉ. संदीप सोनसळे, डॉ. अमोल दह्याळकर, डॉ. पडळू, डॉ. नरेंद्र नांगरे आणि अमृत बालरुग्णालयाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.
लहान वस्तूंपासून मुलांना दूर ठेवा
लहान मुलांना नाणी, बटणाच्या बॅटऱ्या, छोटे खेळण्यांचे भाग किंवा सहज तोंडात जाऊ शकतील अशा वस्तूंपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. खेळताना मुलांनी अशा वस्तू तोंडात घेतल्यास पालकांनी दुर्लक्ष करू नये. मुलाने एखादी वस्तू गिळल्याचा संशय आल्यास घरगुती उपचार किंवा विलंब न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.