कृषी मंत्री भरणे यांनी मोबाइलमधून पाहिला जालना जिल्ह्यातील दुष्काळ

दुष्काळी परिस्थितीचा ऑनलाइन आढावा

Jalna Nayak    19-Sep-2026
Total Views |
 
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी चक्क मोबाइलमधून ऑनलाइन दुष्काळ अनुभवला
 
जालनाः यंदा पावसाने मोठा खंड दिल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांची स्थिती दयनीय झाली असून तसा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून सरकारकडे पाठविण्यात आला आहे. परिस्थिती चिंताजनक असल्याने अशा परिस्थितीत प्रत्यक्ष बांधावर न येता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी चक्क मोबाइलमधून ऑनलाइन दुष्काळ अनुभवला. आ. अर्जुन खोतकर, माजी आ. अरविंद चव्हाण तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी मोबाइलमधूनच भरणे यांच्यासोबत संवाद साधत दुष्काळी मदत तात्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
प्रत्यक्ष बांधावर येऊन विविध भागांना भेटी देऊन परिस्थिती जाणून घेणे गरजेचे असताना कृषी मंत्र्यांनी थेट नांदेड येथे बैठक आयोजित करून मोबाइलमधून दुष्काळ जाणून घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा सोपास्कर तरी कशासाठी असा सूर शेतकऱ्यांतून ऐकायवयास मिळत आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देताना शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.“आपण शेतकऱ्यांचे मामा आणि कृषिमंत्री म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. या दुष्काळी संकटाचा सामना करण्यासाठी शासन आणि मी स्वतः शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत,” असे भरणे यांनी सांगितले. मराठवाड्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी, अशी मागणी शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे केली. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. १९ सप्टेंबर) ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीस विभागातील पालकमंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पीक परिस्थिती, पाणीटंचाई, चारा टंचाई तसेच आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत आमदार अर्जुनराव खोतकर यांनी जालना मतदारसंघासह जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची सविस्तर माहिती प्रत्यक्ष शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतातुन पिकात उभे राहून सहभाग घेतला व नुकसान ग्रस्त पिकांची परिस्थिती, नुकसानीची पाहणी कृषिमंत्र्यांसमोर मांडली. सप्टेंबरअखेर अपेक्षित 165.9 मि.मी. पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात केवळ 31.7 मि.मी. पाऊस झाला असून, हे प्रमाण अवघे 19 टक्के आहे, असे त्यांनी सांगितले.जालना मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष व मोसंबीच्या फळबागा असूनपाण्याअभावी या फळबागा जगविणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. गेल्या सुमारे 40 दिवसांपासून पावसाचा मोठा खंड पडला असून, या काळात केवळ 6 दिवस रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.खरीप पिकांचे पुर्णपणे नुकसान झाले असून आगामी रब्बी हंगामातील पेरण्याही होण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाई, चारा टंचाई आणि फळबागा जगविणे ही मोठी आव्हाने शेतकऱ्यांसमोर उभी आहेत. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी, अशी मागणी आमदार खोतकर यांनी केली.
कर्जवसुली, वीजबिल वसुली थांबवावी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांची पीक कर्जवसुली आणि घरगुती वीजबिल वसुली तात्पुरती थांबवावी, विद्यार्थ्यांची फी माफ करावी, शेतसारा माफ करावा, अशी मागणीही आमदार खोतकर यांनी केली. तसेच पाणीटंचाई निवारणासाठी तातडीने उपाययोजना सुरू कराव्यात, पिकांचे सरसकट पंचनामे करावेत, चारा छावण्या सुरू कराव्यात आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली.
 
 
मामा म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा
मामा म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा
यावेळी आमदार खोतकर यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना भावनिक आवाहन करताना म्हटले की, “मुख्यमंत्री देवाभाऊ आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे भाऊ म्हणून सुमीत्राताई पवार बहीण म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेतच. आपण शेतकऱ्यांचे मामा म्हणून या भयानक दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून मदत करावी. मामाचा आधार फार मोठा असतो. त्यामुळे शेतकरी वर्ग आपल्या आधाराची वाट पाहत आहे.