जालनाः ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून दीपक रणनवरे हे गांधी चमन येथे उपोषणास बसले आहेत. मात्र पाच दिवसानंतरही उपोषणाबाबत सराकरकडून कोणतीच दखल घेतली गेली नसल्याचे चित्र आहे. विविध राजकीय पदाधिकारी व संघटनांचे पदाधिकारी भेट देऊन रणनवरे यांना पाठिंबा देत असले तरी ज्या गतीने अथवा आपुलकीने या उपोषणाची दखल शासनाकडून घ्यायला पाहिजे होती ती घेतली नसल्याने ब्राह्मण समाजातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
बुधवारी उपोषणस्थळी जालना महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकार्यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.यावेळी जालना महानगरपालिकेचे उपायुक्त नंदा गायकवाड, समाज विकास अधिकारी आनंद आंभोरे, कार्यालय अधीक्षक रंजना कुलकर्णी आणि आस्थापना प्रभारी लिपिक राहुल लोखंडे उपस्थित होते. मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय व्हावा, हीच आमची ठाम भूमिका असल्याचे ब्राह्मण उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांनी सांगितले. समाजाच्या मागण्या रास्त असून त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. या मागण्यांची शासनाने सकारात्मक दखल घेऊन त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी असल्याचे रणनवरे यांनी सांगितले. परशुराम आर्थिक विकास महामंडळातील रखडलेल्या नियुक्त्या, निधी वाटप, कर्ज वाटप आदींवर समाजाला काही लाभ होईल अशी उपाययोजना करण्याची गरज रणनवरे यांनी व्यक्त केली. उपोषणाला मोठा पाठिंबा मिळत असून शहरासह परजिल्ह्यातील अनेक समाजबांधव उपस्थिती लावून पाठिंबा देत आहेत.