जालना : युवकांच्या प्रश्नांना आणि अपेक्षांना जाणून घेण्यासाठी जालन्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘जेन झी (Gen Z) संवाद’ उपक्रमाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत नगरसेवक अश्विन अंबेकर यांनी अंकुश सर कोचिंग क्लासेससह शहरातील इतर ठिकाणी युवकांशी थेट संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली.
शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, ‘संसदरत्न’ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार अर्जुन खोतकर यांच्या सूचनेनुसार या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक अश्विन अंबेकर यांनी युवकांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडचणी, प्रश्न, गरजा, अपेक्षा आणि भविष्यातील स्वप्नांविषयी जाणून घेतले. शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास, व्यवसायाच्या संधी तसेच जालन्यातील युवकांसाठी उपलब्ध होणाऱ्या विविध संधींबाबत यावेळी चर्चा झाली. ‘युवकांचा आवाज ऐकून त्यांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे’ ही या संवादामागील प्रमुख भूमिका असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जालन्यातील तरुणांच्या कौशल्याला योग्य संधी मिळावी, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात आणि विकासाच्या प्रक्रियेत युवकांचा सक्रिय सहभाग वाढावा, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.युवकांनीही विविध विषयांवर आपली मते, सूचना आणि अपेक्षा मांडल्या. या प्रश्नांचा वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या संवादप्रसंगी नगरसेवक दुर्गेश काठोटीवाले तसेच कुणाल देशमुख यांची उपस्थिती होती. युवकांशी थेट संवाद साधण्याच्या या उपक्रमामुळे जालन्यातील तरुणांच्या प्रश्नांना एक व्यासपीठ मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.