आंतरवाली सराटीत मोठी घडामोड; प्रसाद लाड जरांगे पाटील यांच्या भेटीला

मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर चर्चा; भेटीत नेमके काय ठरते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष

Jalna Nayak    02-Sep-2026
Total Views |

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
जालना- प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटी येथे सुरू असलेले उपोषण पाचव्या दिवशीही कायम असताना बुधवारी रात्री मोठी राजकीय घडामोड घडली. भाजपचे आमदार प्रसाद लाड हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड होत असताना सरकार आणि आंदोलनकर्त्यांमधील संवादाचा मार्ग पुन्हा खुला होण्याची शक्यता या भेटीमुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे लाड आणि जरांगे यांच्यात नेमकी काय चर्चा होते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मागण्यांवर तोडगा निघणार?
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या, कुणबी प्रमाणपत्रे आणि सरकारने तयार केलेल्या मसुद्याबाबत या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. सरकारने यापूर्वी आपला मसुदा जरांगे यांच्यापर्यंत पोहोचवला आहे; मात्र जरांगे यांनी अधिकाऱ्यांऐवजी सरकारच्या मंत्र्यांनी प्रत्यक्ष चर्चेसाठी यावे, अशी भूमिका घेतली आहे. प्रसाद लाड यांनी यापूर्वीही सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. मराठा समाजासंदर्भातील शासन निर्णयांच्या अंमलबजावणीत जाणीवपूर्वक अडथळे आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी भूमिकाही त्यांनी अलीकडे मांडली होती.
मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा अधिक आक्रमक होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.त्यामुळे प्रसाद लाड आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील आजची भेट केवळ सदिच्छा भेट न राहता मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पुढील दिशा देणारी ठरते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.आंतरवाली सराटीत सुरू असलेल्या या चर्चेतून तोडगा निघतो की आंदोलन आणखी तीव्र होते, हे पुढील काही तासांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.