जालना : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंतच्या प्रगती अहवालानुसार मराठवाड्यात तब्बल ३ लाख १५ हजार २३४ अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. प्राप्त अर्जांपैकी ५४३ अर्ज नामंजूर झाले असून केवळ ६५ अर्ज पुढील कार्यवाहीसाठी प्रलंबित आहेत. न्या. संदीप शिंदे समितीच्या कार्यासाठी मराठवाड्यातील जिल्हानिहाय कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा साप्ताहिक प्रगती अहवाल सादर केला जातो. त्यानुसार आतापर्यंत ३ लाख १५ हजार ८४२ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ३ लाख १५ हजार २३४ अर्जदारांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.
बीडमध्ये सर्वाधिक दाखले
मराठवाड्यात सर्वाधिक प्रमाणपत्रांचे वाटप बीड जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यात २ लाख ९ हजार ८७२ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी तब्बल २ लाख ९ हजार ८५१ अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. केवळ ११ अर्ज प्रलंबित असून नामंजूर अर्जांची संख्या १० च्या आसपास आहे.
जालन्यात १८,५८६ प्रमाणपत्रांचे वाटप
जालना जिल्ह्यात १८ हजार ६६२ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १८ हजार ५८६ दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. सध्या केवळ १४ अर्ज प्रलंबित आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २५ हजार ९१८ अर्जांपैकी २५ हजार ८१९ प्रमाणपत्रे वितरित झाली आहेत. ९२ अर्ज नामंजूर झाले असून ७ अर्ज प्रलंबित आहेत. परभणी जिल्ह्यात २० हजार १० अर्ज प्राप्त झाले असून १९ हजार ९६१ प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. २० अर्ज प्रलंबित आहेत. हिंगोलीत १३ हजार ६७२ अर्जांपैकी १३ हजार ६६६ प्रमाणपत्रे वितरित झाली असून एकही अर्ज प्रलंबित नाही. नांदेडमध्ये ४ हजार ९०७ अर्ज प्राप्त झाले असून ४ हजार ८८१ प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. १० अर्ज प्रलंबित आहेत. लातूरमध्ये २ हजार ८५६ अर्जांपैकी २ हजार ८०९ दाखले वितरित झाले असून २ अर्ज प्रलंबित आहेत. धाराशिव जिल्ह्यात १९ हजार ९४५ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १९ हजार ६६१ प्रमाणपत्रांचे वाटप झाले असून २८३ अर्ज नामंजूर झाले आहेत. केवळ एक अर्ज प्रलंबित आहे. सप्टेंबर २०२५पासून ३१ ऑगस्ट २०२६पर्यंत मराठवाड्यात ७६ हजार २१३ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक ४६ हजार ७२८, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ६ हजार १६५, जालन्यात ४ हजार २११, परभणीत ७ हजार २३६, हिंगोलीत ४ हजार ९८७, नांदेडमध्ये ५८६, लातूरमध्ये ६०० आणि धाराशिवमध्ये ५ हजार ७०० प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेत मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अर्ज निकाली काढण्यात आले असून, बहुतांश जिल्ह्यांत प्रलंबित अर्जांची संख्या अत्यल्प राहिली आहे.