जालना जिल्ह्याला क्षयरोगमुक्त करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल

रोटरी क्लब ऑफ जालना आणि एस.आर.जे. पित्ती स्टीलच्या सीएसआर निधीतून

Jalna Nayak    02-Sep-2026
Total Views |
 
हा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.
 
जालना - जिल्ह्याला क्षयरोगमुक्त करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, रोटरी क्लब ऑफ जालना आणि एस.आर.जे. पित्ती स्टीलच्या सीएसआर निधीतून बुधवार, २ सप्टेंबर रोजी तब्बल ६०० क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले. भारत सरकारच्या ‘प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियाना’अंतर्गत हा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्णकांत कनवारीया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती हॉल येथे हा वितरण सोहळा पार पडला. उपजिल्हाधिकारी (रोहयो) मनिषा दांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात रुग्णांना कोरड्या पोषण आहाराचे किट सुपूर्द करण्यात आले.
यावेळी एस.आर.जे. पित्ती स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक यशराज पित्ती, रोटरी क्लब ऑफ जालनाचे अध्यक्ष प्रशांत महाजन, माजी अध्यक्षा वर्षा पित्ती, तसेच रमेश मगरे, हेमंत ठक्कर, डॉ. दीपक बगडिया आणि रवी भक्कड यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जी. एम. कुडलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. क्षयरोगाच्या उपचारादरम्यान नियमित औषधोपचाराबरोबरच उत्तम पोषण मिळणे अत्यंत गरजेचे असते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून रोटरी क्लबने प्रोटीनयुक्त कोरडा पोषण आहार उपलब्ध करून दिला आहे, ज्यामुळे रुग्णांच्या उपचाराला आणि बरे होण्याच्या प्रक्रियेला मोठी मदत होईल, असा विश्वास यावेळी डॉ. कुडलीकर यांनी व्यक्त केला. या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाबद्दल त्यांनी रोटरी क्लब व एस.आर.जे. पित्ती स्टीलचे विशेष आभार मानले. कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी, एनटीईपी कर्मचारी, क्षयरुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.