जालना- जालना महानगरपालिकेतील भाजपच्या दोन गटांमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना पक्षशिस्तीचे धडे दिले. वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून पक्षहिताला प्राधान्य द्यावे, जनतेमध्ये जाऊन काम करावे आणि संघटना अधिक मजबूत करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
भाजपा जालना महानगर जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी (२० सप्टेंबर) कलश सीड्स येथे झाली. बैठकीला रावसाहेब दानवे, माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार सुहास शिरसाठ, माजी आमदार कैलास गोरंटयाल, जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे, जालना महापालिकेतील भाजपच्या दोन नगरसेवकांमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेला वाद चांगलाच गाजला होता. या प्रकरणाची चर्चा पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचली होती. त्यानंतर पुन्हा आठवडाभरापूर्वी महापालिकेत भाजपच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद चर्चेत आले. या पार्श्वभूमीवर दानवे यांच्या पक्षशिस्तीच्या मार्गदर्शनाकडे विशेष लक्ष लागले होते.दानवे यांनी पद, संख्या किंवा व्यक्तिगत मतभेदांपेक्षा पक्षाची शिस्त आणि संघटनात्मक बांधिलकी महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. “मतभेद असतील तर ते पक्षाच्या व्यासपीठावर सोडवा; जनतेसमोर पक्षाची प्रतिमा खराब होईल, असे वर्तन टाळा,” असा संदेश त्यांनी दिल्याचे बैठकीतील चर्चेतून स्पष्ट झाले. यावेळी लोणीकर यांनी शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. आमदार नारायण कुचे यांनी राजकीय ठराव मांडला. कैलास गोरंटयाल यांनी एसआयआर संदर्भातील नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. दरम्यान, जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी ‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. बूथपासून महानगरापर्यंत संघटना मजबूत करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.