नादब्रह्माला आध्यात्मिक आकार; डॉ. पराग चौधरींच्या ‘महादेव मंडल’ वाद्याला भारत सरकारचे पेटंट

संभाजीनगरच्या सुरांच्या तपश्चर्येवर मोहोर

Jalna Nayak    20-Sep-2026
Total Views |

‘इंडियन स्ट्रिंग्ड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट – महादेव मंडल’ या अभिनव वाद्याच्या डिझाइनला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने अधिकृत मान्यता दिली आहे.
 
छत्रपती संभाजीनगर- भारतीय शास्त्रीय संगीताच्या समृद्ध आणि पारंपरिक वारशाला सर्जनशीलता व नवकल्पनेची जोड देत छत्रपती संभाजीनगरातील संगीत क्षेत्रात अभिनव प्रयोग साकारला गेला आहे. डॉ. (सौ.) आयबीपी महिला कला महाविद्यालयाच्या संगीत विभागाचे सहयोगी प्राध्यापक पं. डॉ. पराग श्रीराम चौधरी यांनी विकसित केलेल्या ‘इंडियन स्ट्रिंग्ड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट – महादेव मंडल’ या अभिनव वाद्याच्या डिझाइनला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने अधिकृत मान्यता दिली आहे. या डिझाइनला ३८२०३१-००१ हा पेटंट क्रमांक बहाल करण्यात आला आहे.
आध्यात्मिक प्रेरणेतून वाद्याची रचना
‘महादेव मंडल’ या वाद्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमागे डॉ. चौधरी यांचे आध्यात्मिक सद्गुरू परमपूज्य शंकरबाबा महाराज यांची प्रेरणा आहे. सद्गुरू ध्यानधारणेसाठी बसताना गुडघे एकमेकांच्या जवळ आणून विशिष्ट स्थितीत बसत असत. त्यांच्या याच बैठकीच्या स्थितीपासून प्रेरणा घेत डॉ. चौधरी यांनी तिचा कलात्मक आणि सांगीतिक आविष्कार वाद्याच्या रचनेत केला आहे.
स्वरमंडलावर आधारित अभिनव प्रयोग
‘महादेव मंडल’ हे वाद्य स्वरमंडल या पारंपरिक वाद्यावर आधारित असून त्याला वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक आकार देण्यात आला आहे. भारतीय संगीताची परंपरा, पारंपरिक ज्ञान, आध्यात्मिक प्रेरणा आणि आधुनिक नवकल्पना यांचा संगम या वाद्याच्या निर्मितीत साधण्यात आला आहे.
आपल्या या सांगीतिक प्रवासातील यशाचे श्रेय डॉ. चौधरी यांनी आई-वडिलांसह आपल्याला सुरांची ओळख करून देणारे संगीतगुरू उस्ताद डॉ. गुलाम रसूल खान, आध्यात्मिक गुरू ए. जी. वाडेकर तसेच ‘महादेव मंडल’च्या निर्मितीची प्रेरणा देणारे आध्यात्मिक सद्गुरू परमपूज्य शंकरबाबा महाराज यांना दिले आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरेला आधुनिक कल्पकतेची जोड देत साकारलेल्या या अभिनव वाद्याला पेटंट मिळाल्याने छत्रपती संभाजीनगरच्या सांगीतिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.