जालना : येथील जे.ई.एस. महाविद्यालयात आयोजित ‘फ्रीडम कप २०२६' या आर्चरी 'टूर्नामेंट’ क्रीडा स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेत जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, परभणी आणि बुलढाणा जिल्ह्यांतील एकूण 108 खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या स्पर्धेत इंडियन रिकर्व्ह व कंपाऊंड राऊंड प्रकारात U-7, U-10, U-13, U-15, U-17, U-19, U-25 आणि 25 वर्षांवरील अशा विविध वयोगटांमध्ये सामने घेण्यात आले. लहानग्या खेळाडूंपासून अनुभवी खेळाडूंपर्यंत सर्वांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेची रंगत वाढवली.
या स्पर्धेचे आयोजन जे.ई.एस. महाविद्यालय,जालना,गुरु द्रोणा फाउंडेशन, जालना आणि धनुष्य आर्चरी अकॅडमी, जालना यांच्या वतीने भीष्म आर्चरी असोसिएशन, जालना यांच्या सहकार्याने करण्यात आले.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण जे. ई. एस. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री सर, जालना जिल्हा क्रीडा भारतीचे जिल्हामंत्री उमेश खंदारकर,सहमंत्री सच्चिदानंद जहागिरदार,राजेश देशपांडे, शेख चांद,आर.एम. सारस्वत, तसेच भीष्म आर्चरी जालना संस्थेचे सचिव प्रकाश दुसेजा, यांचे हस्ते करण्यात आले. धनुष्य आर्चरी अकॅडमीचे प्रशिक्षक सचिन टेकुर यांनी स्पर्धा संचालक म्हणून तसेच कु.भवानी कोट्टुल्लू, अक्षय भुरेवाल, मयूर भुरेवाल यांनी पंच म्हणून काम पाहिले तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध प्रशिक्षक, पंच, स्वयंसेवक, पालक आणि सहभागी खेळाडू यांचे विशेष सहकार्य लाभले.
“आपल्या सर्वांच्या विश्वास, सहकार्य आणि प्रोत्साहनामुळे फ्रीडम कप २०२६ यशस्वी झाला. आयोजनादरम्यान काही त्रुटी राहिल्या असल्यास त्या आम्ही सुधारण्याची संधी म्हणून स्वीकारत असून आगामी स्पर्धांमध्ये आणखी चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न करू,” असे यावेळी बोलतांना आयोजकांनी सांगितले.
ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र सीनियर राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धा : प्रकाश दुसेजा, सचिव, जिल्हा धनुर्विद्या संघटना जालना
फ्रीडम कप नंतर आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जालना येथे महाराष्ट्र सीनियर राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या आगामी स्पर्धेसाठी आर्चरीप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, महाराष्ट्रातील आर्चरीपटूंच्या उत्कृष्ट कौशल्याचा थरार अनुभवण्याची संधी मिळणार आहे. “फ्रीडम कप २०२६ हा केवळ एक क्रीडा उपक्रम नसून, आर्चरीला तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा आणि युवा खेळाडूंमध्ये शिस्त, आत्मविश्वास व क्रीडाभावना निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे,” अशी भावना क्रीडा संचालक डॉ हेमंत वर्मा यांनी बोलतांना व्यक्त केली.