जालन्यात महागणेशोत्सवात भक्ती, संगीत, नृत्य आणि नाट्याचा सुरेल संगम

ढोल-ताशांच्या गजरात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

Jalna Nayak    21-Sep-2026
Total Views |

जालना येथे झालेल्या या कार्यक्रमात ढोल-ताशांचा निनाद, गीत-संगीत, नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडले.
जालना : महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याच्या अनुषंगाने जालना जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महागणेशोत्सव २०२६’च्या सांस्कृतिक कार्यक्रम आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अग्रसेन भवन, जालना येथे झालेल्या या कार्यक्रमात ढोल-ताशांचा निनाद, गीत-संगीत, नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडले.
सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात गोविंद–गर्जना प्रतिष्ठान, जालना यांच्या ढोल पथकाच्या दमदार सादरीकरणाने झाली. ढोल-ताशांच्या गजराने आणि गणरायाच्या जयघोषाने कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात ढोल पथकाला दाद दिली. यानंतर श्री गणेश पूजन, दीपप्रज्वलन आणि आरती करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या मंगल कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
 
 
जालना येथे झालेल्या या कार्यक्रमात ढोल-ताशांचा निनाद, गीत-संगीत, नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडले.
 
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आरती संपन्न झाली. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महागणेशोत्सवाच्या आयोजनामागील उद्देश आणि सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व त्यांनी सांगीतले. यानंतर ‘स्वरराज संगीत रजनी, जालनाच्या कलाकारांनी गीत, संगीत आणि नृत्याचे सादरीकरण केले. विविध गीतांनी आणि नृत्याविष्कारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. कलाकारांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या पुढील सत्रात उत्कर्ष थिएटर्स, जालना यांच्या वतीने ‘बाप्पा येतो घरा’ ही नाटिका सादर करण्यात आली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.