विशाल अस्वार
वालसावंगी: समाजात अजूनही संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अधिकारी कसे कार्यरत असतात, याचे उत्तम उदाहरण वालसावंगी येथे समोर आले आहे. एका अत्यंत दयनीय आणि गंभीर अवस्थेत सापडलेल्या रुग्णाला स्वतः पुढाकार घेऊन बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यामुळे एका रुग्णाचा जीव थोडक्यात बचावला आहे.यासाठी वालसावंगी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश मळेकर यांनी पुढाकार घेतला आहे.
मधुकर साळवे असे या रुग्णाचे नाव असून, ते मागील काही दिवसांपासून अत्यंत हलाकीच्या आणि विदारक स्थितीत जीवन जगत होते. ते स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्याही मनःस्थितीत नव्हते. त्यांच्या शरीरावर आणि पायावर जखमा होऊन जंत (किडे) पडले होते. वेळेवर उपचार न मिळाल्यास त्यांची प्रकृती अधिक खालावून गेली होती.विदारक परिस्थिती त्यांची झाली होती.
वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीची मदत:
ही बाब समजताच वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश मळेकर यांनी तातडीने मानवीय दृष्टिकोनातून पुढाकार घेतला. रुग्णाची बिकट अवस्था पाहता क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी ताबडतोब रुग्णवाहिका (अम्बुलन्स) बोलावून घेतली. त्यानंतर गणेश बोडखे यांच्या सोबतीने या रुग्णाला बुलढाणा येथील शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी सुखरूप पाठवले. डॉ. निलेश मळेकर यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे आणि समयसुचकतेमुळे एका गरजू व दुर्लक्षित रुग्णाला नवीन आयुष्य मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, सर्वत्र त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.