जालना : गोमातेला राष्ट्रमातेचा सन्मान मिळावा, देशभरात गोहत्या पूर्णतः प्रतिबंधित करून गोमातेला संरक्षण मिळावे, तसेच संपूर्ण भारतात समान गोसेवा घडावी यासाठी स्वतंत्र केंद्रीय गोसेवा मंत्रालयाची स्थापना करून केंद्रीय कायदा लागू करण्यात यावा, या मागण्यांसाठी श्री गणेश महासंघ, अद्विक क्लब, रोटरी क्लब ऑफ जालना इलाईट आणि इनरव्हील क्लब ऑफ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी शिवसेनेचे युवा नेते अभिमन्यू खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य गौसन्मान जनजागृती रॅली काढण्यात आली.
मस्तगड येथील श्री मंमादेवी माता गणेश मित्र मंडळात आरती आणि मंमादेवीमातेचे दर्शन करून अभिमन्यू खोतकर यांच्या हस्ते आणि शिवसेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते कमलेश खरे, नगरसेवक दुर्गेश कटोटीवाले प्रमुख उपस्थितीत रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्री गणेश महासंघाचे अध्यक्ष श्लोक अग्रवाल, महासचिव भूषण यादव, कार्याध्यक्ष ॲड. महेश धन्नावत, उपाध्यक्ष डॉ. शिवदत्त विजयसेनानी, आनंद बंब, गौरव बोरा, माजी अध्यक्ष रोहित भुरेवाल, मार्गदर्शक बाबा नंद, उद्योजक सागर मित्तल, युवा उद्योजक अर्जुन पित्ती, अमोल बांगड यांच्यासह अद्विक क्लब, रोटरी क्लब ऑफ जालना इलाईट, इनरव्हील क्लब ऑफ जालनाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गौसन्मान स्वाक्षरी अभियानाला अधिक व्यापक स्वरूप देण्याचे आवाहन करत गांधी चमन आणि जुना जालना भागातील गणेश मंडळात भेट देऊन स्वाक्षरी फॉर्म देण्यात आले.
यावेळी अभिमन्यू खोतकर म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने गोमातेला ‘राज्यमाता’ दर्जा देऊन ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आता हाच सन्मान देशपातळीवर मिळण्यासाठी गोमातेला 'राष्ट्रमाता' घोषित केले पाहिजे आणि देशभरातील गोहत्या समूळ नष्ट झाली पाहिजे. या लोकभावनेचा आदर करत १ लाख नागरिकांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून हा लढा अधिक तीव्र केला जाईल. याप्रसंगी कमलेश खरे, दुर्गेश कटोटीवाले, श्री गणेश महासंघाचे अध्यक्ष श्लोक अग्रवाल, महासचिव भूषण यादव यांनीही मनोगत व्यक्त केले.