जालना - जालना शहरातील खाद्यप्रेमींच्या पसंतीला उतरलेल्या मोहन सनराईज फॅमिली रेस्टॉरंटने स्विगीवर विक्रीचा नवा टप्पा गाठला आहे. ऑगस्ट महिन्यातील एका दिवसात या रेस्टॉरंटने तब्बल 900 ऑर्डर पूर्ण केल्या. विशेष म्हणजे, या एकाच दिवसात ग्राहकांनी तब्बल 2 हजार 700 व्हेज बिर्याणींची ऑर्डर दिली. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत स्विगीच्या वतीने मोहन सनराईजचा ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. समीहन मोहन इंगळे हे या हॉटेलचे संचालक असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बुधवार, 23 सप्टेंबर रोजी स्विगीचे महाराष्ट्र राज्याचे जनरल मॅनेजर वृषभ धर, एरिया सेल्स मॅनेजर आलोक भारद्वाज आणि सेल्स मॅनेजर अभिजित नेटके यांनी मोहन सनराईज रेस्टॉरंटला भेट दिली. यावेळी रेस्टॉरंटचे संचालक मोहन इंगळे यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. स्विगीच्या डिलिव्हरी टीमचे सदस्यही यावेळी उपस्थित होते.वृषभ धर यांनी सांगितले की, मोहन सनराईज रेस्टॉरंट 2018 पासून स्विगीशी जोडलेले आहे. एका दिवसात 900 ऑर्डर पूर्ण करणारे आणि त्यामध्ये 2 हजार 700 व्हेज बिर्याणींच्या ऑर्डर पूर्ण करणारे हे राज्यातील पहिले रेस्टॉरंट ठरल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबई व पुणे वगळता राज्यातील इतर रेस्टॉरंटच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात मोहन सनराईजच्या व्यवसायात 35 टक्के वाढ झाल्याचेही धर यांनी नमूद केले. या यशामागे रेस्टॉरंटच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांची मेहनत व सातत्य असल्याचे त्यांनी सांगितले.
हॉटेलचे युवा संचालक समीहन मोहन इंगळे यांनी सांगितले की, सनराईज हॉटेलमधून आम्ही ग्राहकांना दर्जेदार सेवा देतो. त्याचबरोबर स्वीगीसह अन्य ऑनलाइन सेवावरून देखील तेवढीच दर्जेदार सेवा देतो. ग्राहकांना वेळेत व रूचकर जेवण मिळावे हा आमचा मुख्य उद्देश व ध्येय असल्याचे समीहन सांगतात.