जालना : शेतकरी हिताला आणि आधुनिक शेतीला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या अंबड तालुक्यातील ‘कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्या’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गळीत हंगाम २०२४-२५ साठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लि., नवी दिल्ली यांच्यातर्फे उच्च साखर उतारा क्षेत्रातील ‘सर्वोत्तम ऊस विकास’ द्वितीय पुरस्कार कारखान्याला प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार माजी मंत्री राजेश टोपे यांनी स्वीकारला. कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी कारखाना व सागर कारखान्यामुळे शेतकऱ्यांचा शाश्वत विकास करण्याचे काम टोपे कुटुंबाकडून होत असून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमानही ऊस लागवडीमुळे उंचावले आहे.
नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय साखर परिषद व वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि कृष्णपाल गुर्जर यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते हा सन्मान स्वीकारण्यात आला. या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याला उत्तर प्रदेशचे ऊस विकास मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी व संजय सिंह गंगवार, गुजरातचे सहकार मंत्री जीतू भाई वाघाणी, हरियानाचे सहकार मंत्री अरविंद शर्मा, महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, पंजाबचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री गुरमीत सिंह खुडैन उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष केतनभाई पटेल, कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे, चीफ केन ॲडव्हायझर डॉ. डी. बी. डौले यांच्यासह देशभागातून आलेले विविध साखर कारखान्यांचे चेअरमन, संचालक व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कर्मयोगी स्व. अंकुशरावजी टोपे यांनी घालून दिलेली कठोर आर्थिक शिस्त, धोरणात्मक प्रशासकीय निर्णय आणि शेतकऱ्यांच्या हिताला दिलेले प्राधान्य यांमुळेच कारखाना आज देशपातळीवर अग्रेसर आहे. या सातत्यपूर्ण यशस्वी वाटचालीमुळे कारखान्याला आतापर्यंत राज्य व देशपातळीवर तब्बल ४० विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. हा सन्मान म्हणजे कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कुशल कामगार आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सामूहिक कष्टाची पावती आहे.
आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीचा यशस्वी प्रवास
अतिआधुनिक तंत्रज्ञान: शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर आणि ड्रोनद्वारे फवारणी.
पाणी व माती व्यवस्थापन: ठिबक सिंचन, माती परीक्षण, आणि शास्त्रोक्त ऊस लागवड पद्धती.
उत्पादन वाढीसाठी उपक्रम: सुधारित ऊस जातींचा प्रसार, दर्जेदार ऊस रोपे वाटप, शून्य मशागत तंत्रज्ञान, आणि कार्बन क्रेडिटचा अवलंब.
शेतकरी मेळावे, थेट प्रात्यक्षिके आणि वेळोवेळी मिळालेले तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे ऊस शेती अधिक शाश्वत व फायदेशीर ठरत आहे.