जालनाः पावसाने ओढ दिल्याने यंदा खरीप पिकांची स्थिती नाजूक असून जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात मोठा पाऊस न झाल्याने शंभर टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांना मदत देऊन दुष्काळात करण्यात येणाऱ्या उपाययोजना तात्काळ राबवेल असा विश्वास माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. दानवे यांनी बुधवारी सकाळी बदनापूर, सेलगाव, केळीगव्हाण नजिक पांगरी, राजेवाडी, सोमठाणा या भागातील शेतीची पाहणी केल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अनेक भागात दुष्काळी परिस्थिती जाहीर केली असून त्या पार्श्वभूमीवर हे पाहणी दौरे केले. दानवे यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन झालेल्या पिकांचे नुकसान तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. शासन काय उपाय योजना करणार याची माहिती दिली. यावेळी काही शेतकऱ्यांना आश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
बदनापूर तालुक्यातील प्रमुख भाजप नेते बद्रीनाथ पठाडे, वसंत जगताप, बबन शिरसाट, पद्माकर जराड, विलास जराड, प्रदीप साबळे, गोरख रसाळ, कैलास मदन, परमेश्वर मदन, श्रीराम वाघ तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दानवे म्हणाले, पिण्याचे पाणी, हाताला रोजगार,जनावरांना चारा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत या गोष्टींना प्राधान्य असून त्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आता मोठा पाऊस पडला तरी पिकांना लाभ होणार नाही. मात्र पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी होऊ शकते. प्रशासकीय पातळीवर नियोजन सुरू असून येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांना मदत मिळेल असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी आमच्या सरकारने काय करावे हे सांगू नये त्यांनी काय केले हे प्रथम सांगावे त्यांच्या सरकारच्या काळात फक्त एक हेक्टरक्षेत्राला मदत मिळत. आमच्या मुख्यमंत्र्यांनी दोन हेक्टर क्षेत्राला मदत जाहीर केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन वर्षे मुख्यमंत्री होते. एक अथवा दोन वेळेस ते मंत्रालयात गेले. त्यांनी निवडणूक आयोगाविरूद्ध बोलण्याऐवजी दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकरी यावर बोलण्याची गरज आहे. उद्धव ठाकरेंचा कोणावरच विश्वास नसल्याची खरमरीत टीका दानवे यांनी केली.