जालना : आकाशात झेप घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जालन्यातील मुलींना व्यावसायिक वैमानिक (कमर्शियल पायलट) होण्याची दिशा मिळाली. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या ‘गिव्हिंग विंग्ज टू फ्लाय’ या विशेष कार्यशाळेला जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील 250 हून अधिक विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
इंडिगोच्या सीएसआर उपक्रमांतर्गत भारत केअर्सच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत विमान वाहतूक क्षेत्रातील करिअरच्या संधी, कमर्शियल पायलट होण्यासाठीची पात्रता, प्रशिक्षण आणि निवड प्रक्रियेबाबत विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली.
कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवारिया आणि अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या उपस्थितीत झाले. पारंपरिक करिअरच्या पर्यायांबरोबरच विमान वाहतूक क्षेत्रातील संधींचा विचार करण्याचे आवाहन यावेळी विद्यार्थिनींना करण्यात आले. भारत केअर्सचे कार्यक्रम समन्वयक कल्पेश मोहोद आणि मास्टर ट्रेनर रुपेश गाडेकर यांनी विद्यार्थिनींना कमर्शियल पायलट होण्यासाठी आवश्यक पात्रता, निवड प्रक्रिया, प्रशिक्षण तसेच भविष्यातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी पायलट प्रशिक्षण, अभ्यासक्रम, पात्रता आणि विमान वाहतूक क्षेत्रातील करिअरविषयी विविध प्रश्न विचारले. संवादात्मक पद्धतीने झालेल्या या सत्रामुळे विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन झाले.
जालन्यातील बारवाले महाविद्यालयाच्या कॅप्टन गार्गी गिरी यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. नुकतेच दक्षिण आफ्रिकेत कमर्शियल पायलट प्रशिक्षण पूर्ण केलेल्या गिरी यांनी पायलट होण्याचा स्वतःचा प्रवास, प्रशिक्षणादरम्यान आलेल्या अडचणी आणि त्यासाठी केलेल्या मेहनतीची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने महत्त्वाची भूमिका होती. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बाळासाहेब खरात, शिक्षण विस्तार अधिकारी विनया वडजे, समन्वयक सुनील ढाकरके आणि तंत्रस्नेही सोरटी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. कलेक्टर थिंक टँक फेलो सुप्रविण पाखरे, मुख्यमंत्री फेलो सिमरन जैस्वाल आणि मुख्यमंत्री फेलो तनया सावंत यांनीही आयोजन व समन्वयासाठी सहकार्य केले.कार्यशाळेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता ‘गिव्हिंग विंग्ज टू फ्लाय’च्या दुसऱ्या बॅचसाठी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत नोंदणी सुरू आहे. पात्र विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जालना जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.