गणेशोत्सव म्हटला की आजच्या काळात डोळ्यांसमोर येते ती रोषणाई, डीजेचा दणदणाट, ढोल-ताशांचा गजर आणि विसर्जनाच्या मिरवणुकीची लगबग. उत्सवाच्या उत्साहात नकळत ध्वनी, जल आणि पर्यावरण प्रदूषण वाढत आहे. बदलत्या सामाजिक वातावरणात उत्सवांचे स्वरूपही अनेकदा आपल्या मूळ उद्देशापासून दूर जाताना दिसते. विशेषतः आधुनिक इंटरनेट, मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात झपाट्याने बदलणारी तरुणाई कधी कधी क्षणिक आकर्षण, दिखावा आणि अनावश्यक स्पर्धेच्या प्रवाहात आपल्या संस्कृतीच्या आणि सामाजिक बांधिलकीच्या मुळांपासून दूर जात असल्याचे चित्र सर्वत्र
दिसते. मात्र, उत्सव म्हणजे केवळ जल्लोष नव्हे, तर संस्कार; केवळ मनोरंजन नव्हे, तर समाजप्रबोधन; केवळ गर्दी नव्हे, तर माणसांना जोडणारा सेतू, याची जिवंत अनुभूती मंठा तालुक्यातील हेलस गाव गेली तब्बल १३८ वर्षे देत आहे.
‘उत्सव साजरा करायचा, पण निसर्गाची किंमत मोजून नाही; श्रद्धा जपायची, पण समाजातील सलोखा गमावून नाही,’ हा विचार कृतीत उतरवणाऱ्या हेलसच्या गणेशोत्सवात ना डीजेचा दणदणाट, ना कर्णकर्कश ध्वनीप्रदूषण, ना गणेशमूर्ती विसर्जनाची धावपळ. उलट सर्व जाती-धर्मातील ग्रामस्थ एकत्र येऊन श्रद्धा, संस्कृती, कला, सामाजिक एकोपा आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडवतात. विशेष म्हणजे आजच्या आधुनिक युगातही गावातील तरुण गणेश चतुर्थीच्या महिनाभर आधीपासून एकत्र येऊन नाटकांचा सराव करतात; मोबाईलच्या पडद्यापलीकडे रंगमंचाचा प्रकाश अनुभवतात आणि आपल्या पूर्वजांनी जपलेली सांस्कृतिक परंपरा पुढच्या पिढीकडे सोपवतात. ही तरुणाईला केवळ मनोरंजनाची नव्हे, तर आपल्या मातीशी, संस्कृतीशी आणि समाजाशी नाते जोडण्याची प्रेरणा देणारी परंपरा आहे.
आज महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात विविधतेत एकता, परस्पर सन्मान आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ करण्याची गरज आहे. अशा वेळी जाती-धर्माच्या भिंती ओलांडून १३८ वर्षे एकत्रितपणे उत्सव साजरा करणारे हेलस हे केवळ एक गाव राहत नाही; ते सामाजिक एकोप्याची जिवंत शाळा बनते. आजच्या तरुणांनी आधुनिकतेचा स्वीकार जरूर करावा; मात्र आधुनिकतेच्या प्रवाहात आपल्या संस्कृतीची मुळे, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरणाप्रतीचे भान गमावू नये, असा मूक पण अत्यंत प्रभावी संदेश हेलसचा गणेशोत्सव देतो.
म्हणूनच हेलसचा हा गणेशोत्सव केवळ गणरायाच्या भक्तीचा उत्सव नाही; तो निसर्ग जपण्याचा, माणसे जोडण्याचा, संस्कृती टिकवण्याचा आणि पुढच्या पिढीला योग्य दिशा देण्याचा १३८ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास आहे.
प्राचीन हेलस गाव मंठा शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर, औरंगाबाद–हैदराबाद महामार्गालगत वसलेले हेलस हे ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे. प्रसिद्ध शिल्पकार यांचे हे जन्मस्थान मानले जाते. त्यांनी मोदी लिपी आणि हेमाडपंती मंदिरशैलीचा प्रसार केला.गावात सुमारे ३५०० लोक विविध समाजघटकांमधून एकत्र नांदतात. गावात सर्वत्र प्राचीन मंदिरे, मूर्ती व शिलालेखांचे अवशेष विखुरलेले दिसतात. हेलस येथील गणेशोत्सव यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवापूर्वीपासूनच साजरा होत असल्याचे सांगितले जाते. २००६ साली स्व. शंकरराव खरबे (वय १०५) यांनी सांगितले की हा उत्सव शेकडो वर्षांपासून सुरू आहे. अधिकृत नोंदीनुसार यावर्षी या उत्सवाला १३८ वर्षे पूर्ण झाली आहेत.
स्थापना आणि विसर्जनाशिवाय साजरा होणारा देशातील एकमेव गणेशोत्सव
हेलसमध्ये कुणीही आपल्या घरी गणपतीची स्थापना करत नाही. गावाच्या मधोमध प्राचीन असे गणपती मंदिर आहे. या मंदिरात साडेतीन फुट उंचीच्या पूर्वाभिमुख गणेशाच्या मूर्ती म्हणजे या गावचे ग्रामदैवत. शेकडो वर्षांपासून गावातील सर्व लोक एकत्र येऊन मध्यवर्ती प्राचीन हेमाडपंती मंदिरात विराजमान असलेल्या स्वयंभू गणेशाची पूजा करतात.यामुळे येथे इतरत्र गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व विसर्जन अशा पद्धतीने साजरा केला जाणारा गणेशोत्सव अनुभशयास मिळत नाही. मंदिरातील गणेश मूर्तीची पुजा करुन रितीरिवाजाप्रमाणे भागवतकथा सुरू करुन पालखी पौर्णिमेला गणेशाची पालखीतून मिरवणूक काढून उत्सवाची सांगता केली जाते. त्यामुळे याठिकाणी ना गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली जाते,ना विसर्जन मिरवणूक, त्यामुळेच स्थापना व विसर्जनाशिवाय पर्यावरणाचा संपूर्ण समतोल राखून शेकडो वर्षांपासून साजरा होणारा हेलसचा सार्वजनिक गणेशोत्सव हा भारतातील एकमेव गणेशोत्सव मानला जातो. पालखी पौर्णिमेला या उत्सवाची सांगता दिमाखदार पद्धतीने होते. सकाळी मंदिरात श्रींची महाआरती होते. दुपारी भागवत कथेची सांगता झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते.येथील महाप्रसादाचेही वैशिष्ट्य आहे. गव्हाच्या कण्यांमध्ये गूळ घालून तयार केलेला शिरा आणि येथील खास कढी हा महाप्रसाद असतो. विशेष म्हणजे येथील कढीची चव दहा कढईतही सारखीच असते, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आणि परंपरा आहे.रात्री आठ वाजता श्रींची पालखी खांद्यावर घेऊन संपूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते. विशेष म्हणजे पालखी संपूर्ण मिरवणुकीदरम्यान कुठेही खांद्यावरून खाली ठेवली जात नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता मंदिरात पालखीची सांगता होते. एरवी दिवाळी, दसरा, नागपंचमी अशा सणांना आपण लेकीबाळींना माहेरी आणतो. मात्र, हेलसच्या पालखी पौर्णिमेचे वैशिष्ट्य काही वेगळेच आहे.आजपर्यंत या गावातून ज्या-ज्या मुली लग्न होऊन बाहेरगावी गेल्या आहेत, त्या आपल्या तीन-चार पिढ्यांसह या दिवशी आवर्जून गावात येतात. प्रत्येकाच्या घरी त्या दिवशी किमान २० पाहुणे असतात. या माहेरवाशिणी आपल्या बालमैत्रिणींना भेटतात आणि जुन्या आठवणींना उजाळा देतात. त्यामुळे संपूर्ण गावात एक प्रकारचे रोमांचकारी आणि आनंददायी वातावरण निर्माण होते.यामुळेच हेलसचा हा गणेशोत्सव 'माहेरवासिनींचा गणेशोत्सव' म्हणूनही ओळखला जातो.
सांगितीक नाट्योत्सवाची समृद्ध परंपरा आजही कायम आहे.
महाराष्ट्राला नाट्यपरंपरेचा पुरातन वारसा लाभला आहे. याच पुरातन वारशाची साक्ष हेलस येथील गणेशोत्सवासोबत चालत आलेली सांगितीक नाट्यपरंपरा देते.गणेशोत्सवादरम्यान दरवर्षी येथे तीन नाटकांचे सादरीकरण करण्याची परंपरा आजही येथील तरुणांनी जपली आहे व ती पुढे चालवली जात आहे. नाटकात प्रामुख्याने सामाजिक, धार्मिक आणि विनोदी नाटकांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश असतो. आजच्या आधुनिक इंटरनेट, मोबाईल, संगणक आणि सोशल मीडियाच्या युगात मनोरंजनाची साधने अक्षरशः हातात आली आहेत. तरीदेखील हेलस गावातील अबालवृद्ध, तरुण आणि महिला या सांस्कृतिक परंपरेला जिवंत ठेवण्यासाठी आजही एकत्र येतात. विशेष म्हणजे गणेश चतुर्थीच्या तब्बल एक महिना अगोदरपासून गावातील तरुण दररोज एकत्र येऊन नाटकांचा सराव करतात. आधुनिक मनोरंजनाच्या साधनांच्या काळातही तरुणाईने रंगभूमीशी असलेले हे नाते जपणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.येथील नाट्यपरंपरा मात्र अद्याप उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात एकसंघतेसोबतच राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारे नाट्यप्रयोग येथे झाले. स्वातंत्र्यानंतर प्रत्येकाला आपल्या हक्कांची जाणीव करून देणारे नाट्यप्रयोगही सादर करण्यात आले.स्वातंत्र्यपूर्व काळात या नाटकांना निजाम दरबारी परवानगी मिळवून देण्यासाठी पाथरी, जि. परभणी येथील देवराव काळे आणि नगर येथील बाबुलाल महाराज यांनी विशेष प्रयत्न केले. 'लोकरंजनातून लोकज्ञान' हे ब्रीदवाक्य समोर ठेवून या ठिकाणी आजवर सर्वोत्तम नाटकांचे सादरीकरण झाले आहे. १९५३ साली 'तारामती' नाटकातील साहेबराव खराबे यांनी साकारलेली स्त्री पात्राची भूमिका विशेष गाजली होती. येथील नाट्यपरंपरेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आजतागायत स्त्री पात्रांची भूमिका पुरुष कलाकारच साकारतात.'राजा हरिश्चंद्र', 'संगीत सौभद्र', 'एकच प्याला' यासह असंख्य नाटकांचे प्रयोग येथे झाले आहेत. हेलसचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बहुजातीय असलेल्या या छोट्याशा गावात मागील १३८ वर्षांपासून सर्व जाती-धर्मातील लोक एकत्र येऊन आनंदाने गणेशोत्सव साजरा करतात.आधुनिकतेच्या आणि इंटरनेट-संगणकाच्या युगातही गावातील प्रत्येक पिढी या परंपरेशी जोडलेली आहे. ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शन करतात, तरुण नाट्यपरंपरा आणि उत्सवाची धुरा सांभाळतात, महिला उत्सवातील विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमात सहभागी होतात आणि लहान मुलेही या परंपरेतून संस्कार घेतात. म्हणूनच हा केवळ गणेशोत्सव नाही, तर पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या सामाजिक एकोपा, सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरण संवर्धनाचा उत्सव आहे.
ध्वनिप्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श
आज गणेशोत्सव, विविध सण, उत्सव, जयंती आणि पुण्यतिथीच्या कार्यक्रमांमध्ये डीजे व तत्सम ध्वनिवर्धकांच्या वापरामुळे ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत हेलसचा गणेशोत्सव सर्वांसाठी आदर्शवत ठरतो.ना डीजे, ना कर्णकर्कश आवाज, ना ध्वनिप्रदूषण आणि ना पाण्याचे प्रदूषण!सर्व जाती-धर्मातील लोकांनी डीजे व तत्सम ध्वनिप्रदूषण करणाऱ्या माध्यमांपासून दूर राहून सण, उत्सव, जयंती आणि पुण्यतिथी साजरी करावी, असा अप्रत्यक्ष संदेशच हेलसचा गणेशोत्सव देत आहे.
खरोखरच, उभ्या देशाला संदेश देणारे हेलस हे गाव आणि तेथील गणेशोत्सव!
ना ढोल-ताशांच्या आवाजातून होणारे ध्वनिप्रदूषण, ना मूर्ती विसर्जनातून होणारे जलप्रदूषण. उलट, दहा दिवस नव्हे तर संपूर्ण गावाला एकसंध करणारी ही परंपरा आज १३८ वर्षांनंतरही तितक्याच उत्साहाने जिवंत आहे व ही परंपरा कायम जोपासली जाईल - दिपक खराबे, अध्यक्ष ,श्री गणेश संस्थान,हेलस
संतोष मुसळे, जालना
मो. ९७६३५२१०९४