गणेश विसर्जनासाठी जालना प्रशासन सज्ज; मोतीबाग विसर्जन कुंडाची संयुक्त पाहणी

आयुक्त अंजली शर्मा, पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला व्यवस्थेचा आढावा

Jalna Nayak    24-Sep-2026
Total Views |
 
 मोतीबाग येथील विसर्जन कुंडाची पाहणी करताना महापालिका आयुक्त अंजली शर्मा, पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्यासह अधिकारी व कर्मचारी.
 
जालना - श्री गणेश विसर्जन सोहळा शांततेत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वातावरणात पार पडावा, यासाठी जालना महापालिका आणि पोलीस प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. उद्या, दि. २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मोतीबाग येथील विसर्जन कुंडाची गुरुवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली.
यावेळी महापालिका आयुक्त अंजली शर्मा आणि पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्यासह पोलीस प्रशासन तसेच महापालिकेतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विसर्जनाच्या दिवशी होणारी गर्दी, गणेश मंडळांच्या मिरवणुका, नागरिकांची सुरक्षितता आणि विसर्जनस्थळी आवश्यक सुविधांचा प्रत्यक्ष आढावा अधिकाऱ्यांनी घेतला. विसर्जनासाठी मोतीबाग परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते येणार असल्याने पोलीस बंदोबस्त आणि गर्दी नियंत्रणाचे नियोजन करण्यात आले आहे. विसर्जनस्थळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. अग्निशमन यंत्रणा तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी, यासाठी संबंधित यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले. विसर्जनस्थळी नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था आणि स्वच्छता यांचा आढावा घेण्यात आला. रात्रीच्या वेळीही विसर्जनाची प्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यासाठी पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विसर्जनादरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी आणि निर्माल्य जमा होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्वच्छता कर्मचाऱ्यांची आवश्यक ती व्यवस्था ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले.
 
पर्यावरणपूरक विसर्जनावर भर
गणेशमूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावे, यासाठी विसर्जन कुंड आणि निर्माल्य संकलन केंद्रांची पाहणी करण्यात आली. निर्माल्य नदी, नाले किंवा इतर जलस्रोतांमध्ये टाकले जाऊ नये, यासाठी नागरिकांनी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या संकलन केंद्रांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.
 
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरात मोठी गर्दी होणार असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, मिरवणुकीदरम्यान शिस्त राखावी आणि पोलीस व महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवत सुरक्षितता, स्वच्छता आणि पर्यावरणाची काळजी घेत विसर्जन सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी जालना प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे.