जालना: जालना शहरातील बसस्थानक परिसरातील एका लॉजमध्ये एका युवकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार आत्महत्येचा आहे की घातपात, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.
प्राप्त माहितीनुसार, लॉजमधील एका खोलीचा दरवाजा बराच वेळ उघडत नसल्याने संशय बळावला आणि याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. सदर बाजार पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केली असता खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून किंवा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा एक युवक खोलीत पालथ्या अवस्थेत मृतयुमुखी पडलेला आढळून आला. या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मृत युवकाच्या हाताला सलाईन लावले होते आणि सलाईनची बाटली कापलेल्या स्थितीत आढळली. तसेच त्याच्या शेजारील टेबलवर मद्याची बाटली आणि विषारी औषधाची बाटलीही पोलिसांना सापडली आहे. घटनास्थळावर मिळालेल्या ओळखपत्रावरून मृत युवकाची ओळख पटली असून, निवृत्ती बाबूजी फरताडे (रा. तुपेवाडी, बावणे पांगरी) असे त्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेत सदर बाजार पोलिसांनी तातडीने पंचनामा केला आणि मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी जालना शहरातील शासकीय सामान्य रुग्णालयात पाठवला. त्याचबरोबर, फॉरेन्सिक (तज्ज्ञ) पथकानेही घटनास्थळी धाव घेत लॉजमधील खोलीची अत्यंत बारकाईने पाहणी केली व विविध नमुने गोळा केले. सध्या पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत. हा घातपात आहे की टोकाचे पाऊल उचलून केलेली आत्महत्या, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या सखोल तपासानंतरच या रहस्यामागचे नेमके सत्य बाहेर येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.