जालना : राष्ट्रप्रेम, त्याग व सहनशीलतेचा अमिट वारसा असलेल्या भिल्ल समाजाचे राष्ट्रपुरुषांच्या आणि भगवंताच्या सेवेतील योगदान अत्यंत मोठे आहे, असे गौरवोद्गार अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे महामंत्री प.पू. राष्ट्रीय संत स्वामी श्री गोविंददेवगिरीजी महाराज यांनी काढले. ते जालना तालुक्यातील देऊळगाव राजा रोडवरील आनंदगडावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते.बुधवार, दिनांक २३ सप्टेंबर रोजी प.पू. संत श्री भगवान महाराज आनंदगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष शिवरतन मुंदडा यांच्या विशेष सहकार्यातून क्रांतीवीर टंट्या मामा भिल्ल यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली, तर देवगिरी कल्याण आश्रमाचे उपाध्यक्ष दिलीप चेचाणी यांच्या सहकार्यातून ब्रह्मर्षी मतांग ऋषींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत पार पडली.यावेळी बोलताना स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या संघर्षात भिल्ल समाजाने नेहमीच मोलाची साथ दिली. अन्यायग्रस्तांना आधार देणारे टंट्या मामा हे खऱ्या अर्थाने गरिबांचे 'रॉबिनहूड' होते. शबरी माता हे परमार्थ व प्रेमाचे, तर टंट्या मामा हे पुरुषार्थाचे प्रतीक आहेत. हा अनावरण झालेला पुतळा उपस्थितांना सदैव पुरुषार्थाची प्रेरणा देत राहो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी या पुतळ्याचे भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवरतन मुंदडा यांनी केले, तर उपस्थितांचे आभार दिलीप चेचाणी यांनी मानले. आनंदगड ही एक पावन तपोभूमी असून येथे सामाजिक समरसता, ज्ञान आणि भक्तीचा सुंदर संगम पाहायला मिळतो, असा सूर यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. या धार्मिक व सामाजिक सोहळ्याला परिसरातील नागरिक, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक शिवरतन मुंदडा यांनी केले तर सर्वांचे आभार दिलीप चेचाणी यांनी मानले. यावेळी कौतिकराव भुतेकर, ज्ञानेश्वर घोलप, किसन महाराज लष्कर, संदीप भाऊ गो.सेवक, हानूमान महाराज, रावसाहेब घारे, भगवानराव डोंगरे, गणेशराव खरात, बळीराम साबळे, विठ्ठलराव टेकाळे, मनोजकोलते, भरत साबळे, राजू वाघ, निवृत्ती साबळे, नारायण माऊली साबळे आदींची उपस्थिती होती.