पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या आदेशाने विकासकामांचे ऑडिट; भोकरदन-जाफ्राबादमध्ये अधिकाऱ्यांची ‘ऑन द स्पॉट’ कारवाई

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या सूचनेवरून जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची पाहणी; टेंभुर्णीतील अंगणवाडी अर्ध्या तासात स्वच्छ, वरुड आरोग्य केंद्रातील त्रुटी दूर करण्याचे निर्देश

Jalna Nayak    25-Sep-2026
Total Views |

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या सूचनेवरून जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची पाहणी; 
 
भोकरदन : पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या सूचनेवरून जिल्हा नियोजन विभागाकडून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मागील तीन वर्षांत झालेल्या विविध विकासकामांचे रँडम ऑडिट सुरू आहे. याच अनुषंगाने जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी यांच्या पथकाने भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान त्रुटी आढळलेल्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या तीन वर्षांत विविध लेखाशीर्षांतर्गत वितरित निधी, झालेला खर्च आणि त्यातून पूर्ण झालेल्या कामांची प्रत्यक्ष स्थिती तपासण्यात येत आहे. कागदोपत्री नोंदींसोबतच प्रत्यक्ष स्थळपाहणी करून कामांची गुणवत्ता, पूर्णत्वाची स्थिती आणि निधीचा वापर याची पडताळणी केली जात आहे. पाहणी दौऱ्यात टेंभुर्णी येथील अंगणवाडीची तपासणी करण्यात आली. यावेळी अंगणवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात घाण तसेच गवत वाढलेले असल्याचे निदर्शनास आले. लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब लक्षात घेऊन जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी यांनी संबंधित ग्रामसेवकाला परिसर तातडीने स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या.
कुलकर्णी यांच्या सूचनेनंतर संबंधित यंत्रणेने तत्काळ कार्यवाही करत अवघ्या अर्ध्या तासात अंगणवाडी परिसर स्वच्छ करून घेतला.  यानंतर जमनाबाई काबरा विद्यालय तसेच कै. मारोतराव देशमुख विद्यालयातील क्रीडांगण विकासाच्या कामांची पाहणी करण्यात आली. संबंधित कामांची प्रत्यक्ष स्थिती, उपलब्ध सुविधा आणि विकासकामांचा दर्जा याबाबत माहिती घेण्यात आली. तसेच मानव विकास कार्यक्रमांतर्गत बसचीही तपासणी करण्यात आली. संबंधित सुविधांचा लाभ अपेक्षित लाभार्थ्यांना मिळत आहे का, याचीही पाहणी करण्यात आली. जाफ्राबाद तालुक्यातील वरुड (बु.) येथील आरोग्य केंद्राच्या बांधकामाची पाहणी केली असता बांधकामातील काही त्रुटी तसेच काही कामे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. याची दखल घेत जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी यांनी भोकरदनच्या उपअभियंत्यांना संबंधित त्रुटी दूर करून अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही तसेच आवश्यक सुधारणा गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण होतील, याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले.
वर्गखोल्या तयार,  स्थलांतरित नाही
देऊळगाव उगले येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्गखोल्यांचीही पाहणी करण्यात आली. वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण झालेले असतानाही शाळा अद्याप नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आले.
याबाबत संबंधित मुख्याध्यापकांना शाळा लवकरात लवकर नवीन वर्गखोल्यांमध्ये स्थलांतरित करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी यांनी दिल्या.
त्रुटी आढळताच  सूचना
या पाहणीदरम्यान विकासकामांची कागदोपत्री माहिती आणि प्रत्यक्ष स्थळावरील परिस्थिती यांची पडताळणी करण्यात आली. ज्या ठिकाणी त्रुटी, अस्वच्छता किंवा अपूर्ण कामे आढळली, तेथे संबंधित यंत्रणांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या सूचनेवरून सुरू असलेल्या या रँडम ऑडिटमुळे विकासकामांचा दर्जा, निधीचा योग्य वापर आणि प्रलंबित कामांची स्थिती यावर प्रशासनाचे थेट लक्ष असल्याचे या पाहणी दौऱ्यातून स्पष्ट झाले.