जालनाः दहा दिवसांच्या स्थापनेनंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भक्त सज्ज झाले असून सकाळपासूनच अनेक मंडळ तसेच घरगुती गणपतींची विसर्जन सोहळा सुरू झालेला आहे. ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण, संगीत वाद्य तसेच आतषबाजीने मिरवणुकांना प्रारंभ झाला. जालना शहरातील मोतीबाग तलावाजवळ मनपाच्या विसर्जन कुंडात विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून महानगर पालिका तसेच पोलिस प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे.यासोबतच भोकरदन, अंबड, घनसावंगी, मंठा, परतूर, जाफराबाद, बदनापूर या तालुक्यातही गणपती विसर्जनाचा उत्साह आहे.
ज्यांना गणपती मूर्ती विसर्जित करायची नाही त्यांच्यासाठी मूर्तीदान केंद्रही सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी गणेश भक्त आपली मूर्ती दान देऊ शकतात. नवीन तसेच जुना जालना भागातील शेकडो मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन उद्या सकाळपर्यंत पूर्ण होईल असा अंदाज महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मोठ्या श्री गणपती मूर्तींच्या विसर्जनासाठी 6 क्रेन घरगुती श्री गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी 10 कृत्रिम विसर्जन कुंड घरगुती श्री गणेश मूर्ती दान करण्यासाठी दोन विशेष पथके सुरक्षिततेसाठी 50 जीवरक्षक महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्यासह एकूण 630 कर्मचारी पोलीस कर्मचारी व होमगार्ड महानगरपालिकेमार्फत एमएसएफ सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांचे विसर्जन सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीतपणे पार पडावे यासाठी महानगरपालिका प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा विसर्जनस्थळी कार्यरत असून सकाळी आठ वाजेपासून घरगुती श्री गणेश विसर्जनास सुरुवात झालेली आहे.