विशाल अस्वार
वालसावंगी: केगाव, सोलापूर येथील भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय येथील अंतिम वर्षातील संगणक अभियांत्रिकीचे विद्यार्थी वालसावंगीचा भूमिपुत्र कार्तिक किशोर कोथलकर यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी झेनोडो या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ओपन सायन्सच्या माध्यमातून २२ संशोधन पेपर प्रकाशित केले असून, त्यांच्या २२ ही संशोधन पेपरला डीओआय (डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर) क्रमांक प्राप्त झाला आहे.
डीओआय म्हणजे डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर, अर्थात डिजिटल स्वरूपातील संशोधन साहित्याची स्वतंत्र व कायमस्वरूपी ओळख पटविणारा विशिष्ट क्रमांक होय. त्यामुळे प्रकाशित संशोधन पेपरची स्वतंत्र ओळख होते आणि तो सहज शोधता व संदर्भीत करता येतो. कार्तिक कोथलकर यांनी विविध विषयांवर अभ्यास व संशोधन करून आपले संशोधन कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केले आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण संशोधन कार्यामुळे शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात त्यांच्या योगदानाची नोंद झाली आहे.
अभियांत्रिकी शिक्षणासोबतच संशोधन क्षेत्रात सक्रिय सहभाग घेत त्यांनी हे यश मिळवले आहे. त्यांच्या या कार्यामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील योगदानात भर पडली असून यासाठी सीसी रुपाली सरडे, विभागप्रमुख प्रा. आनंद ज्ञानबोते तसेच प्राचार्य डॉ. अनिल देशमाने यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच महाविद्यालयाचे अध्यक्ष अभियंता रवींद्र गायकवाड आणि सचिव अनामिका गायकवाड यांचेही प्रोत्साहन लाभले. प्राचार्य डॉ. अनिल देशमाने यांनी कार्तिक कोथलकर यांचे संशोधन कार्य विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने त्यांचे प्रकाशित संशोधन पेपर महाविद्यालयाच्या ग्रंथालयात मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. तसेच गावकऱ्यांनी देखील कौतुक केले आहे