एनबीडब्ल्यूतील चार फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

भोकरदन पोलिसांची विशेष मोहीम; चौघांना न्यायालयात हजर

Jalna Nayak    25-Sep-2026
Total Views |

भोकरदन पोलिसांची विशेष मोहीम
 
भोकरदन : न्यायालयात प्रलंबित असलेल्या विना-जामीनपात्र वॉरंटची प्रभावीपणे बजावणी करण्यासाठी भोकरदन पोलिसांनी विशेष मोहीम राबवत विविध गुन्ह्यांमध्ये दीर्घकाळापासून फरार असलेल्या तसेच न्यायालयात गैरहजर राहणाऱ्या चार आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना गुरुवारी (ता. २४) न्यायालयात हजर करण्यात आले.
मा. उच्च न्यायालय तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार भोकरदन पोलिस ठाण्याच्या हद्दीत विना-जामीनपात्र वॉरंटमधील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान पोलिस पथकाने आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये राजू किसन कुदर (रा. पळसखेडा मुर्तड, ता. भोकरदन), योगेश नायबराव ठोंबरे (रा. जवखेडा ठोंबरे, ता. भोकरदन), शेख मोबीन शेख युनूस (रा. तडेगाव, ता. भोकरदन) आणि शेख युनूस शेख रहीमोद्दीन (रा. तडेगाव, ता. भोकरदन) यांचा समावेश आहे.
न्यायालयाकडून जारी करण्यात आलेल्या विना-जामीनपात्र वॉरंटनंतरही संबंधित आरोपी न्यायालयीन प्रक्रियेत गैरहजर राहत असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ही विशेष मोहीम हाती घेतली होती. पोलिस पथकाने उपलब्ध माहितीच्या आधारे शोध घेऊन चौघांना अटक केली. त्यानंतर त्यांना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी आणि फरार आरोपींचा शोध यापुढेही प्रभावीपणे सुरू राहणार असून, कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे भोकरदन पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी सांगितले. ही कारवाई पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधु, अपर पोलिस अधीक्षक डॉ. विक्रम साळी, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर आणि प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक फौजदार संतोष राऊत, पोलिस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ मंडलिक, पोलिस अंमलदार नंदुकुमार दांडगे, पोलिस अंमलदार शरद शिंदे आणि पोलिस अंमलदार रानगोते यांनी सहभाग घेतला.