करपलेल्या सोयाबीनसह दुष्काळी शासन निर्णयाची होळी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वडीगोद्री येथे निषेध; हेक्टरी एक लाख रुपये मदतीची मागणी

Jalna Nayak    26-Sep-2026
Total Views |
 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वडीगोद्री येथे आंदोलन केले.
 
वडीगोद्री- दुष्काळाच्या तीव्र झळांमुळे खरीप पिके करपून शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी उपाययोजना अपुऱ्या असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वडीगोद्री येथे आंदोलन केले. करपलेल्या सोयाबीनच्या शेतात हातात पिके घेऊन शासन निर्णयाची होळी करण्यात आली. यावेळी सरकारच्या घोषणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शासन निर्णयात शेतसाऱ्यात हेक्टरी केवळ २०० रुपयांची सूट देण्यात आली आहे. करपलेल्या पिकांच्या तुलनेत ही मदत अत्यल्प असून, सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याची टीका संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी केली.
दुष्काळी उपाययोजनांमध्ये कर्जवसुलीस स्थगिती आणि कर्जाचे पुनर्गठन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. सरकारने ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केल्याचे सांगितले असताना पुन्हा कर्जवसुली स्थगितीची गरज काय, असा सवाल काळे यांनी उपस्थित केला. शेतात पाणीच नसल्याने शेतीपंपाचा वापर होणार नाही, मग वीज बिलातील सवलतीचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ किती, असा प्रश्नही संघटनेने उपस्थित केला. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत, तातडीने पीकविमा आणि सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात मुकेश डुचे, सुभाष भोईटे, प्रकाश सुरासे, भारत उंडे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले.