वाकडीतील शुभम वाघ मृत्यू प्रकरणाला नवे वळण; वडिलांचा घातपाताचा संशय, तिघांविरुद्ध गुन्हा

विवाहानंतर दुरावा... न्यायालयीन वाद अन् चार दिवसांनी तरुणाचा मृत्यू

Jalna Nayak    26-Sep-2026
Total Views |

शुभम येडुबा वाघ (२६)
 
भोकरदन : विवाह झाला... काही महिने संसार सुरळीत सुरू राहिला; नंतर पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाले. पत्नी माहेरी गेली, प्रकरण न्यायालयात पोहोचले. त्यानंतर एका तरुणाने धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आणि अवघ्या चार दिवसांनी पतीचा रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत मृत्यू झाला.
भोकरदन तालुक्यातील वाकडी येथील शुभम येडुबा वाघ (२६) याच्या मृत्यूची ही घटना आता पोलिस तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे. शुभमचा मृत्यू मोटारसायकलच्या धडकेत झाल्याचे घटनाक्रमातून समोर आले असताना, त्याचे वडील येडुबा राजाराम वाघ यांनी या घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभमचा विवाह २७ नोव्हेंबर २०२४ रोजी पुनम उर्फ छकुली हिच्याशी झाला होता. फिर्यादीनुसार, लग्नानंतर काही महिने दोघांचा संसार सुरळीत होता. त्यानंतर घरगुती कारणांवरून वाद होऊ लागले. पुढे पुनम माहेरी गेली. तिला पुन्हा नांदण्यासाठी आणण्यासाठी शुभमच्या कुटुंबीयांनी जालना न्यायालयात दावा दाखल केला.  ४ जुलै रोजी रवि चिंचपुरे याने शुभमला न्यायालयातील दावा मागे घेण्याबाबत धमकी दिल्याचे वडिलांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
 
चार दिवसांनी...
७ जुलैची रात्र. रात्री साडेसातच्या सुमारास जेवण झाल्यानंतर शुभम नेहमीप्रमाणे भोकरदन रोडवरील शेताकडे पायी निघाला. काही वेळातच त्याच्या वडिलांना पोलिस पाटलांचा फोन आला. कैलास चिंचपुरे यांच्या शेतासमोर शुभम गंभीर जखमी अवस्थेत आढळला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. कुटुंबीयांनी त्याला तातडीने भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी उपस्थितांकडून सोपान संजय जाधव याच्या मोटारसायकलची शुभमला धडक झाल्याचे समजल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मात्र, हा अपघात नसून पूर्वनियोजित कट असण्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला आहे.  या सर्व आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी सोपान संजय जाधव, रवि महादु चिंचपुरे आणि पुनम उर्फ छकुली शुभम वाघ यांच्याविरुद्ध येडुबा राजाराम वाघ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीतील आरोप तपासाच्या अधीन असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.