कोरड्या दुष्काळानं घेतला आणखी एक बळी; १४ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तरुण शेतकरीपुत्राची प्राणज्योत मालवली!

दुष्काळाची दाहकता

Jalna Nayak    28-Sep-2026
Total Views |

तरुण शेतकरीपुत्राची प्राणज्योत मालवली
 
विशाल अस्वार
​वालसावंगी:  ​वालसावंगी:​निसर्गाची क्रूर वक्रदृष्टी, कोरड्या दुष्काळामुळे उद्ध्वस्त झालेला संसार आणि हाताबाहेर गेलेली परिस्थिती... या सगळ्याच्या चक्रव्यूहात अडकून जालना जिल्ह्यातील  भोकरदन तालुका, पिंपळगाव रेणुकाई (गट क्र. १६८, कोटी शिवार) येथील अवघ्या ३५ वर्षांच्या तरुण शेतकरीपुत्राने टोकाचं पाऊल उचललं. विष प्राशन करून मृत्यूशी सलग १४ दिवस झुंज देणाऱ्या दत्ता डीगंबर हिवरे या तरुण शेतकऱ्याची आज सकाळी ९ वाजता घाटी रुग्णालयात प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण वालसावंगी परिसरात शोककळा पसरली असून, एका हतबल शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
​दत्ता हिवरे यांच्या कुटुंबाकडे अवघ्या दोन एकर जमिनीचा तुकडा आहे. निसर्गाच्या लहरीपणापुढे आणि तीव्र कोरड्या दुष्काळामुळे यंदा या मोजक्याच कोरडवाहू शेतीत एक दाणाही पिकला नाही.शेतात पैशाची तजवीज करून लावलेले सोयाबीन पीक डोळ्यादेखत पावसावाचून करपून गेले शेतीसाठी केलेला खर्च आणि भविष्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, या विवंचनेत दत्ता पुरता अडकला होता.वारंवार आत्महत्याचा विचार मनात घर करून बसला होता.नैराश्याच्या आणि हतबलतेच्या भयंकर गर्तेत जात त्याने १४ दिवसांपूर्वी विष प्राशन केले. त्याला तातडीने बुलढाणा येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले; पण चौदा दिवस मृत्यू आणि वेदनांशी संघर्ष केल्यानंतर आज सकाळी ९ वाजता त्याने जगाचा निरोप घेतला. ​मागे वृद्ध आई आणि वडील असा दुःखी परिवार उरला आहे. घराचा एकमेव कर्ता आणि तरुण आधार असलेला मुलगा अशा पद्धतीने निघून गेल्यामुळे या वृद्ध आई-वडिलांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आता आटले आहेत. पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णालयाच्या उंबरठ्याबाहेर टाहो फोडणाऱ्या त्या आई-वडिलांची अवस्था पाहून उपस्थितांचेही काळीज पिळवटून निघाले.​शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र महाराष्ट्रात थांबायचे नाव घेत नाहीये. दोन एकराच्या तुकड्यावर घाम गाळणाऱ्या बळीराज्याला आज जगण्याचा अधिकारही उरला नाही का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. शेतीमालाला हमीभाव नाही, दुष्काळाची मदत नाही आणि जगण्याची शाश्वती नाही, यामुळे हताश झालेला शेतकरीपुत्र मृत्यूला मिठी मारत आहे. ​हॉस्पिटलच्या बेडवर चौदा दिवस मरण यातना, वेदना सहन करणाऱ्या या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू केवळ एक आकडा नाही, तर तो या असंवेदनशील व्यवस्थेच्या कपाळावरील कलंक आहे. आता तरी या शासनाच्या डोक्यात प्रकाश पडणार का? या उद्ध्वस्त झालेल्या वृद्ध आई-वडिलांच्या अश्रूला शासन आणि प्रशासन कधी वाली होणार? हाच सवाल आज प्रत्येक संवेदनशील मनाला अस्वस्थ करत आहे.