घनसावंगी : अविनाश घोगरे
पावसाने पाठ फिरवल्याने आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दुष्काळ जाहीर झाल्याने काहीसा दिलासा मिळाला असला, तरी आता शासनाकडून प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. पावसाअभावी खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून कापूस, सोयाबीन, तूर, ऊस फळपीके यासह विविध पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळाची घोषणा कागदावर न राहता त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचविण्याची मागणी होत आहे.
घनसावंगी तालुक्यात यंदा सुरुवातीच्या पावसानंतर पावसाने मोठी दडी मारली. त्यानंतर दीर्घकाळ पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा संपला. उभी पिके पाण्याअभावी करपली, कापसाची पाने गळू लागली, सोयाबीनच्या शेंगा भरण्याआधीच पिकाची अवस्था बिकट झाली. अनेक भागांत विहिरी, बोअरवेल आणि शेततळी आटण्याच्या मार्गावर असल्याने पिकांना पाणी देणेही शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. दुष्काळामुळे केवळ खरीप पिकांचेच नुकसान झाले नाही, तर पशुधनाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शेतातील चारा संपत चालल्याने पशुपालकांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. पिण्याच्या पाण्यासाठीही अनेक गावांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे शेतीसोबतच पशुपालनावरही दुष्काळाचा मोठा परिणाम झाला आहे.
पंचनामे आणि पीकविम्याची प्रतीक्षा
पिकांचे प्रत्यक्ष नुकसान मोठे असताना शेतकऱ्यांना आता नुकसानभरपाईच्या पंचनाम्यांची आणि पीकविमा भरपाईची प्रतीक्षा आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, पीकविम्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी आणि दुष्काळी सवलतींचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, अशी मागणी होत आहे.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे आणि मशागतीवर मोठा खर्च केला. मात्र पावसाअभावी अपेक्षित उत्पादनच हातात येणार नसल्याने हा खर्च वसूल होण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यात बँकेचे कर्ज, खासगी उधारी, मुलांचे शिक्षण, घरखर्च आणि आगामी रब्बी हंगामाची तयारी अशा अनेक जबाबदाऱ्यांचा ताण शेतकऱ्यांवर आहे.
पिकाला पाणी नाही, हातात पैसा नाही आणि डोक्यावर कर्ज आहे. दुष्काळ जाहीर झाला, आता शासनाची मदत कधी येते याचीच वाट पाहतोय, अशी भावना परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.
दुष्काळाची घोषणा ही शेतकऱ्यांसाठी केवळ सुरुवात असून त्यानंतरच्या मदतीची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे तातडीने पंचनामे करून प्रत्यक्ष नुकसानाच्या प्रमाणात मदत, पीकविमा भरपाई, चारा उपलब्धता आणि पाणीटंचाईवरील उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
“दुष्काळ जाहीर झाला, आता शासनाची मदत लवकर हातात पडली पाहिजे. पिकं डोळ्यादेखत करपली; एवढा खर्च करूनही हातात काहीच उरलं नाही. पाऊस येईल, पीक वाचेल म्हणून शेवटपर्यंत आशा धरून बसलो; पण पावसानं साथ दिली नाही. आता शासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी. त्यातून आमचं झालेलं संपूर्ण नुकसान भरून निघणार नाही, पण या संकटाच्या काळात थोडाफार आधार नक्की मिळेल.”
- सतिश कदम, शेतकरी
“दुष्काळ जाहीर झाला, ही दिलासादायक बाब आहे; मात्र आता शासनाने प्रत्यक्ष मदत लवकर शेतकऱ्यांच्या हातात देणे गरजेचे आहे. पावसाअभावी कापूस, सोयाबीनसह खरीप पिके डोळ्यादेखत करपली. बियाणे, खते आणि औषधांवर खर्च करूनही पदरी काहीच पडले नाही. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. दुष्काळाची घोषणा कागदावर न राहता त्याचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे.”
-ज्ञानेश्वर उढाण,युवा शेतकरी संघर्ष समिती