मुख्य निवडणूक आयुक्ताविरोधात जालन्यात काॅंग्रेस आक्रमक

खासदार काळे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Jalna Nayak    28-Sep-2026
Total Views |
 
मुख्य निवडणूक आयुक्ताविरोधात जालन्यात काॅंग्रेस आक्रमक
 
जालना- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काॅंग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत तासभर रास्ता रोकोही केला. दरम्यान, रास्ता रोको करणारे खासदार डॉ. कल्याण काळे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर काॅंग्रेस पक्षाने गंभीर आक्षेप घेतला आहे. ज्ञानेश कुमार यांना निवडणूक आयुक्त पदावरून तात्काळ हटविण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी काॅंग्रेस पक्षातर्फे सोमवारी ( दि. २८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. निदर्शने झाल्यानंतर काॅंग्रेस पक्षाच्या वतीने तासभर रास्ता रोको आंदोलनही केले. यावेळी आंदोलक ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत शासनाचे लक्ष वेधले. जोपर्यंत निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविले जात नाही तोपर्यंत काॅंग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू राहील, असा निर्धार खासदार डॉ. कल्याण काळे यांच्यासह माजी आमदार राजेश राठोड, जिल्हाध्यक्ष कल्याण दळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
या आंदोलनात काॅंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख, काॅंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राजाभाऊ कुलकर्णी, शहराध्यक्ष डॉ. विशाल धानुरे , संजय मुथा, नरेंद्र मित्तल, सुनील चौधरी,अशोक उबाळे, राजेंद्र गोरे, सुभाष कोळकर,सुरेश गवळी, कृष्णा पडुळ, शेख इब्राहिम, संजय इंगळे, देवलाल डोंगरे, शांतीलाल बनसोडे, नारायण वाढेकर यांच्यासह नगरसेवक तसेच काॅंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रास्ता रोकोमुळे वाहतूक तासभर खोळंबली होती.
खासदार कल्याण काळे पोलिसांच्या ताब्यात
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व रास्ता रोकोचे नेतृत्व करणारे खासदार डॉ. कल्याण काळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संतप्त झालेल्या काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून पोलिसांचे वाहन अडवून ठेवले. शेवटी पोलिसांच्या वाहनातून खासदार काळे व अन्य पदाधिकाऱ्यांना जालना तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.