डेंग्यू नियंत्रणासाठी खासगी रुग्णालयांना अहवाल व रॅपिड टेस्ट रिर्पोटिंग बंधनकारक

बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

Jalna Nayak    28-Sep-2026
Total Views |

जिल्ह्यातील डॉक्टर्सची बैठक झाली
 
जालना: जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांविरुद्ध कठोर मोहीम राबविण्याचे आणि डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरांवर समन्वयाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल (भा.प्र.से.) यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील डॉक्टर्सची बैठक झाली. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
जिल्ह्यात 671 खासगी वैद्यकीय व्यावसायिक असून त्यापैकी 36 जण बोगस असल्याचे आढळले आहे. आतापर्यंत बोगस डॉक्टरांविरुद्ध ७ तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व 7 प्रकरणांत कारवाई झाली आहे. बदनापूर तालुक्यात बोगस डॉक्टरांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दोषींवर तत्काळ गुन्हे (एफआयआर) दाखल करण्याचे निर्देश दिले. त्या म्हणाल्या की, बोगस डॉक्टरांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
जिल्ह्यात यावर्षी 28 सप्टेंबरपर्यंत डेंग्यूचे 17 रुग्ण आढळले असून, सध्या जिल्ह्यात डेंग्यूचा उद्रेक झालेला नाही. आतापर्यंत 881 रॅपिड डेंग्यू एनएस१ अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 17 चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, विविध ठिकाणी घरांमध्ये साचलेल्या पाण्यात डासांच्या अळ्या आढळण्याचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डासांचे जीवनचक्र तोडण्यासाठी साचलेले पाणी तातडीने हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डेंग्यूचे हॉटस्पॉट शोधून त्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत. डेंग्यू संशयित तसेच बाधित रुग्णांची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देणे खासगी रुग्णालयांना बंधनकारक करण्यात येणार आहे. ताप असलेल्या डेंग्यू संशयित रुग्णांची रॅपिड डेंग्यू चाचणी करून त्याचे अहवाल संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना कळवावे लागणार आहेत. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील रुग्णालयांना नियमित भेटी देऊन तपासणी व सनियंत्रण करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. खासगी रुग्णालयांकडून गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच बोगस डॉक्टरांची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.