गणेशोत्सवात सलग सहा दिवस शिबिर; 130 मधुमेहग्रस्त तर 210 जण प्रीडायबेटिक आढळले

बगडिया ट्रस्ट व रोटरी रेनबो क्लबतर्फे 2078 जणांची मधुमेह निदान चाचणी

Jalna Nayak    28-Sep-2026
Total Views |

बगडिया ट्रस्ट व रोटरी रेनबो क्लबतर्फे 2078 जणांची मधुमेह निदान चाचणी
जालना- मधुमेहाचे तात्काळ निदान व्हावे आणि गुंतागुंत निर्माण होण्यापूर्वीच उपचार सुरू करता यावेत, यादृष्टीने सौ. जमनाबाई शिवरतनजी बगडिया चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ जालना रेनबोच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त बडीसडकवर गणेश भक्तांसाठी आयोजित सहादिवशीय मोफत मधुमेह निदान शिबिरात 2078 जणांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी 130 जणांना मधुमेह असल्याचे तर 210 जण प्रीडायबेटिक असल्याचे निदान झाले, अशी माहिती मधुमेह तज्ञ डॉ. राजेश सेठिया यांनी दिली.
गणेशोत्सव काळात बडीसडकवर गणेश भक्तांची गणपती पाहण्यासाठी मोठी गर्दी असते. त्या अनुषंगाने 19 ते 24 सप्टेंबरदरम्यान दररोज रात्री 7 ते 12 या वेळेत रुबी हॉस्पिटलसमोर हे शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या शुभारंभप्रसंगी सौ. जमनाबाई शिवरतनजी बगडिया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पन्नालाल बगडिया, माजी प्रांतपाल डॉ. सुरेश साबू, डॉ. राजेश सेठिया, संतोष तिवारी, रोटरी क्लब ऑफ जालना रेनबोच्या अध्यक्षा मधुलाता भक्कड, सचिव डॉ. अतुल जिंतूरकर, कोषाध्यक्ष केतन शहा, जयेश पहाडे, डॉ. नितीन खंडेलवाल, संदीप राठी, गौरव करवा, विवेक मणियार, कल्पेश भक्कड, महेश माळी, पंकज लड्डा आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ. सेठिया म्हणाले की, वेळीच निदान झाल्यास मधुमेह नियंत्रित ठेवता येतो. प्री-डायबेटिक असणाऱ्यांचे मधुमेह रुग्ण म्हणून रूपांतर होते. वेळीच निदान आणि उपचारानंतर त्याला मधुमेह रुग्ण होण्यापासून वाचविता येऊ शकते. ही बाब विचारात घेता, प्रत्येकाने मधुमेह निदान करून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. रोटरी रेनबो क्लबच्या अध्यक्षा मधुलता भक्कड यांनी या शिबिराचा उद्देश विशद केला आणि यापुढेही आवश्यक तेथे निदान शिबिरे घेतली जातील, असे स्पष्ट केले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी रोटरी रेनबो क्लब आणि रुबी हॉस्पिटलचा स्टाफ डॉ. लीना पवार, डॉ. मिथुन चालोदे, शर्मिला सिन्हा, संगीता लांडगे, मीना घुमरे, छाया खंदारे, बाबुल अल्हाट, अजीम मणियार, संजय जोगदंड, सतीश वरखडे, संदीप राऊत आदींनी विशेष परिश्रम घेतले.
 
“समाजोपयोगी उपक्रमांसाठी ट्रस्टचे सदैव सहकार्य-पन्नालाल बगडिया आरोग्य, शिक्षण आणि समाजसेवा या क्षेत्रांना प्राधान्य देऊन समाजोपयोगी उपक्रमांना हातभार लावणे, हा सौ. जमुनाबाई शिवरतनजी बगडिया चॅरिटेबल ट्रस्टचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. त्या अंतर्गत डॉ. राजेश सेठिया यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या एक लाख मोफत मधुमेह निदान चाचण्या, मोफत थायरॉईड निदान चाचण्या तसेच फुप्फुस तपासणीसारख्या आरोग्यविषयक उपक्रमांना ट्रस्टने सक्रिय सहकार्य केले आहे. गरजू घटकांना आरोग्यसुविधा सहज उपलब्ध करून देतानाच आरोग्यविषयक जनजागृती आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला चालना देणे, हे ट्रस्टचे प्रमुख उद्दिष्ट आहे. भविष्यातही आरोग्य, शिक्षण आणि समाजहिताशी संबंधित विविध उपक्रमांना ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने सहकार्य केले जाईल, असे सौ. जमुनाबाई शिवरतनजी बगडिया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पन्नालाल बगडिया यांनी सांगितले.”